बेळगाव लाईव्ह :प्रसूतीनंतर बाळंतीण महिलांचे शासकीय रुग्णालयात होणारे मृत्यू आणि नुकत्याच झालेल्या नवजात बालकाच्या मृत्यूच्या निषेधार्थ कर्नाटक भाजप महिला मोर्चाच्यावतीने आज निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
शासकीय रुग्णालयांमध्ये होणारे गर्भवती महिलांच्या आणि नवजात अर्भकांच्या मृत्युंच्या निषेधार्थ कर्नाटक भाजप महिला मोर्चातर्फे मोर्चाच्या कर्नाटक राज्याध्यक्षा सी. मंजुळा यांच्या नेतृत्वाखाली आज शनिवारी राज्यभरात जिल्हानिहाय निदर्शने करण्यात आली. त्या अनुषंगाने आज भाजपच्या बेळगाव दक्षिण, उत्तर महिला मोर्चा तसेच ग्रामांतर महिला मोर्चा यांच्यातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. जिल्हाधिकारी (डीसी) मोहम्मद रोशन यांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी भाजप महिला मोर्चा कर्नाटक राज्य सरचिटणीस डॉ. सोनाली सरनोबत, भाजप बेळगाव महानगर अध्यक्षा गीता सुतार, उत्तर महिला मोर्चाच्या अध्यक्षा कल्पना इटगी, शिल्पा हितलगिरी, दक्षिण महिला मोर्चाच्या अध्यक्षा, ग्रामांतरच्या अध्यक्षा नयना भस्मे, शिल्पा केंकरे आदींसह महिला मोर्चाच्या बऱ्याच सदस्या उपस्थित होत्या.
निवेदन सादर करण्यापूर्वी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना डॉ. सोनाली सरनोबत म्हणाल्या की, बेळगाव जिल्ह्याचा विचार केला तर 288 नवजात अर्भकांचा तसेच 14 बाळंतीणींचा शासकीय रुग्णालयांमध्ये मृत्यू झाला आहे हे अत्यंत खेदजनक आहे. बीम्स सारख्या अत्याधुनिक सुविधा असलेल्या रुग्णालयात आवश्यक तज्ञ डॉक्टर, कर्मचारी वगैरे मनुष्यबळाची कमतरता असणे ही दुर्दैवाची गोष्ट आहे.
तेथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन झालेले नाही. अशी जर परिस्थिती असेल तर सर्वसामान्य जनतेला वैद्यकीय सेवेच्या बाबतीत न्याय कसा मिळणार? ग्रामीण भागातील गर्भवती महिलांना मोठ्या विश्वासाने सरकारी रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल केले जाते. मात्र सध्या परिस्थितीत त्यांचा विश्वास सार्थ ठरवला जात नाही हे निषेधार्ह आहे. परवा मृत्यूच्या घटका मोजणाऱ्या एका गर्भवती महिलेला या ठिकाणी उपचार मिळत नाही म्हणून हुबळी येथे हलविण्यात आले. मात्र दुर्दैवाने वाटेतच तिचा मृत्यू झाला. एवढेच नव्हे तर दुःख अनावर होऊन तिच्या पतीनेही आत्महत्येचा प्रयत्न केला.
हे सर्व पाहता आपली आपली वैद्यकीय सुविधा कोणत्या दिशेने चालली आहे? हा प्रश्न पडतो. मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे सध्या जे काही चालले आहे ते पाहून काळजाला पिळ पडतो. या पद्धतीने होणाऱ्या बाळंतीनी आणि नवजात बालकांच्या मृत्यूला जबाबदार कोण? कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांनी त्याची नैतिक जबाबदारी घ्यावयास हवी. बेळगाव दावणगिरी बळ्ळारी वगैरे ठिकाणी आत्तापर्यंत इतक्या अशा घटना घडून देखील त्यावर मंत्र्यांनी कोणतेही जाहीर स्पष्टीकरण दिलेले नाही. चौकशी समिती अथवा आयोग नेमलेला नाही. कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. परवा बेळगाव मध्ये झालेले सरकारचे अधिवेशन हे फक्त देखावा होता त्यानिमित्ताने जनतेच्या कोट्यावधी रुपयांचा चुराडा करण्यात आला. आज सरकार दरबारी सर्वसामान्यांना न्याय मिळेल असा झाला आहे आणि तो मिळवून देण्यासाठी आम्ही भाजप महिला मोर्चातर्फे राज्यभरात आंदोलने करत आहोत.
त्याचाच भाग म्हणून आम्ही बेळगाव उत्तर दक्षिण आणि ग्रामांतर भाजप महिला मोर्चातर्फे आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करत आहोत. मृत्युमुखी पडलेल्या बाळंतिणी व नवजात बालकांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची मागणी आहे, जर या मागणीची दखल घेऊन कारवाई झाली नाही तर भविष्यात उग्र आंदोलन छेडण्याची वेळ येणार आहे, असे डॉ. सोनाली सरनोबत यांनी स्पष्ट केले.