बेळगाव लाईव्ह :इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशनच्या मान्यतेने तसेच कर्नाटक असोसिएशन ऑफ बॉडी बिल्डर्सच्या सहकार्याने रोटरी क्लब ऑफ बेळगाव आणि बेळगाव स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या दि. 14 ते 16 जानेवारी 2025 या कालावधीत सावगांव, बेळगाव येथील सुरेश अंगडी एज्युकेशन फाउंडेशनच्या अंगडी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स येथे बहुप्रतिक्षित राष्ट्रीय स्तरावरील 16 व्या वरिष्ठ पुरुष व महिला शरीर सौष्ठव आणि वुमन मॉडेल फिजिक चॅम्पियनशिप -2025 या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशनने (आयबीबीएफ) आज एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे उपरोक्त अधिकृत घोषणा केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शरीर सौष्ठव या खेळाच्या वाढीला चालना देत असल्याबद्दल बेळगावचे जिल्हाधिकारी (अध्यक्ष संयोजक समिती) मोहम्मद रोशन, बेळगाव शहर पोलीस आयुक्त (सहअध्यक्ष संयोजक समिती) याडा मार्टिन मार्बन्यांग तसेच संयोजक सचिव अजित सिद्दन्नावर आणि त्यांचा कर्नाटक असोसिएशन ऑफ बॉडी बिल्डर्स संघटनेचा चमू यांच्या अटल वचनबद्धतेसाठी व प्रयत्नांसाठी आम्ही मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो असे आयबीबीएफने प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पदके मिळवणारे बेळगावचे एकेकाळचे ख्यातनाम शरीरसौष्ठवपटू मिस्टर इंडिया सुनीलकुमार आपटेकर यांना बेळगावमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेचे ‘ब्रँड अँबेसिडर’ म्हणून घोषित करताना आम्हाला अभिमान वाटत आहे. सुनीलकुमार आपटेकर यांनी आजतागायत एकलव्य पुरस्कार, अरिहंत पुरस्कार, कर्नाटक राज्योत्सव पुरस्कार, प्राइड ऑफ बेलगाम यासारखे बरेच प्रतिष्ठेचे पुरस्कार पटकावले आहेत. याबरोबरच बेळगावातील स्पर्धेसाठी रोख 25 लाख रुपयांची पारितोषिके पुरस्कृत करण्याचे औदार्य दाखवल्याबद्दल आम्ही मंत्री सतीश जारकीहोळी यांचेही मनापासून आभारी आहोत. स्पर्धेतील प्रतिष्ठेचे टायटल अर्थात सर्वांकष विजेतेपद मिळविणाऱ्या स्पर्धकास रोख 3 लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाईल.
इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशनचे अध्यक्ष स्वामी रमेश कुमार यांनी घोषणा पत्रात आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना बेळगावातील स्पर्धा म्हणजे आमच्या शारीरिक क्रीडा समुदायातील प्रगती आणि एकतेचा पुरावा आहे. स्पोर्ट्स कॅलेंडरमध्ये हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरविल्याबद्दल आम्ही आमच्या प्रायोजक, भागीदारांचे आणि खेळाडूंचे आभारी आहोत, असे नमूद केले आहे.
त्याचप्रमाणे डब्ल्यूबीपीएफ आणि आयबीबीएफचे सरचिटणीस चेतन मनोहर पठारे यांनी राष्ट्रीय पातळीवरील 16 वी वरिष्ठ पुरुष व महिला शरीर सौष्ठव स्पर्धा ही शारीरिक खेळांच्या जगात सामर्थ्य, समर्पण आणि कलात्मकतेचा उत्सव आहे.
देशभरातील क्रीडापटूंनी या स्तरावर स्पर्धा करताना, त्यांची वर्षांची मेहनत आणि खेळासाठीची आवड दाखवून देणे हा एक सन्मान आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या उभयतांनी खेळाडूंसह क्रीडाप्रेमींनी बेळगाव येथे होणाऱ्या स्पर्धेला बहुसंख्येने उपस्थित राहून ती यशस्वी करण्यास सहकार्य करावे, असे आवाहनही प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.