बेळगाव लाईव्ह : शहरातील प्रत्येक नागरिकाचे आरोग्य, प्रत्येक विद्यार्थ्याचे शिक्षण आणि तरुणाईच्या उज्वल भविष्यासाठी व्यसनमुक्ती केंद्र यासह विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजसुधारणेसाठी प्रयत्न करण्यासाठी आमदार असिफ (राजू) सेठ फाउंडेशनची स्थापना करण्यात आल्याची माहिती उत्तर मतदार संघाचे आमदार असिफ सेठ यांनी दिली. आज आयोजिण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक संचालक आणि कर्मचारी कार्यरत राहणार असून उत्तम आणि प्रगतिशील शहराची निर्मिती करणे हे आपले ध्येय आहे. शहरातील प्रत्येकाची प्रगती व्हावी यासाठी प्रत्येकाने या कार्याला हातभार लावावा, आयुष्यात चांगले कार्य करावे, गरजूंना मदत करावी असे आवाहन आमदार असिफ सेठ यांनी केले.
समाजातील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गरज पूर्ण व्हावी, प्रत्येक विद्यार्थ्याला उत्तम शिक्षण मिळावे, शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवून प्रयत्न करण्यात येणार आहेत. याचप्रमाणे शैक्षणिक शिबिरांचे आयोजन, शैक्षणिक साहित्य पुरविणे, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास केंद्र, तज्ज्ञांच्या माध्यमातून प्रशिक्षण, उच्च पदावर नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न अशा अनेक उप्रक्रमांच्या माध्यमातून शैक्षणिक प्रगतीवर भर दिला जाईल, असे आम. सेठ यांनी सांगितले. याचप्रमाणे सरकारी शाळेतील पटसंख्या कमी झाल्याने सरकारी शाळा नामशेष होण्याच्या मार्गावर असून यासंदर्भात फाउंडेशनच्या पलीकडे जाऊन आपण आमदार या नात्याने प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले.
सरकारी शाळांची चिंताजनक परिस्थिती लक्षात घेत सरकारी शाळा वाचविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार तसेच खाजगी शाळांच्या बरोबरीच्या किंवा त्याही पेक्षा पुढे जाऊन सरकारी शाळांचा विकास करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आमदारांनी दिली.
यासह प्रत्येक नागरिकांच्या आरोग्यासंदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे. झोपडपट्टीसह सर्वच विभागात आरोग्यासंदर्भात जनजागृती खूप कमी आहे असे आढळून आले आहे. यामुळे वॉर्डनिहाय आरोग्य जनजागृती, सरकारी सुविधा जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध जनजागृतीपर उपक्रम, आरोग्यतपासणी शिबिरे, अस्वच्छतेमुळे पसरणारी रोगराई लक्षात घेऊन परिसर स्वच्छता आणि जनजागृती यासारखे उपक्रम राबवून नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी फाउंडेशनच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे आमदार सेठ म्हणाले.
आमदार असिफ सेठ पुढे म्हणाले, अलीकडे तरुण पिढी व्यसनाधीन होत असल्याचे दिसून येत आहे. अनेक पालक आपल्या मुलांच्या व्यसनमुक्तीसाठी उपाययोजना आखण्यात याव्यात, यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी करत आहेत. व्यसनाधीन झालेल्या तरुणाईच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. केवळ शहरच नाही देशभरात व्यसनाधीनता वाढत चालली आहे.
गांजा, दारू, अंमली पदार्थ यासारख्या पदार्थांचे सेवन केल्याने आरोग्यावर घातक परिणाम होत आहेत. यासाठी पोलीस विभागाशी चर्चा करून अंमली पदार्थ उत्पादन आणि विक्री याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी बैठक घेण्यात आली असून व्यसनमुक्तीसाठी जनजागृती उपक्रम तसेच व्यसनमुक्ती केंद्र स्थापन करण्यासाठी फाउंडेशनच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आमदारांनी सांगितले.
यावेळी प्रशासकीय अधिकारी, युवा नेते अमन सेठ यांच्यासह फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते.