बेळगाव लाईव्ह : नागालँड येथील आसाम रायफल्सच्या 41 बटालियनमध्ये कार्यरत असलेले बेळगाव तालुक्यातील निंगनट्टी गावचे रहिवासी जवान रवी तळवार यांचे वाहन अपघातात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज बेळगाव येथे शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले.
निंगनट्टी गावचे जवान रवी तळवार नागालँडमध्ये सेवा बजावत असताना वाहन अपघातात शहीद झाले. त्यांच्या पार्थिवावर बेळगाव येथे अंतिम विधी पार पाडण्यात आले.
कर्नाटक प्रदेश युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष राहुल जारकीहोळी यांनी उपस्थित राहून त्यांच्या पार्थिवाला श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी बोलताना ते म्हणाले, “आपल्या राज्यातील जवानांचे बलिदान हे अतुलनीय असून, त्यांच्या जाण्याने मोठी हानी झाली आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो अशी प्रार्थना आपण करत आहोत. तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत, असे ते म्हणाले. यावेळी चिक्कोडी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राम गुळी, मंत्री सिध्दू सुंणगार, गावातील ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.
गेल्या बुधवारी पहाटे अपघात घडल्यानंतर संरक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांकडून त्यादिवशी सकाळी मृताच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली. सेवा बजावत असलेल्या नागालँडमधील घाट विभागात त्यांचा मुलगा रवी तलवार चालवत असलेले वाहन खोल दरीत कोसळल्याने तो मरण पावल्याचे सांगण्यात आले.
गेलि 16 वर्षे संरक्षण दलात कार्यरत असलेले रवी आणखी दोन वर्षांत सेवानिवृत्त होणार होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी शीतल तलवार, 11 वर्षांची मुलगी आणि 10 वर्षांचा मुलगा असा परिवार आहे.
अपघाताच्या घटनेनंतर आज शनिवारी सकाळी निंगेनट्टी (ता. बेळगाव) या मूळगावी रवी तलवार यांचे पार्थिव आणण्यात आले. त्यानंतर शोकाकुल वातावरणात लष्करी इतमामात यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराला संपूर्ण निंगेनट्टी गाव लोटले होते.