बेळगाव लाईव्ह :अनगोळ येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्ती अनावरण वादावर अखेर पडदा पडला असून जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी रविवारी ता. 5 रोजी होणारा अनावरण सोहळा लांबणीवर टाकल्याचे जाहीर केले.ही मूर्ती अनावरण मोठ्या प्रमाणात सर्वांना सामावून घेऊन करण्यात येईल, असेही त्यांनी आज शनिवारी रात्री सांगितले.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलिस आयुक्त याडा मार्टीन मार्बन्यांग आणि महापालिका उपायुक्त लक्ष्मी निपाणीकर यांनी रात्री मूर्ती परिसराची पाहणी करून अर्धा तास लोकांशी चर्चा केल्यानंतर प्रसार माध्यमांना माहिती दिली.
महापौर, उपमहापौर यांनी अनगोळ येथील मूर्ती चौथरा वास्तू पूजन केले असून रविवारी अनावरण होणार असल्याचे जाहीर केले होते. पण, पुतळ्याचे काम पूर्ण झाले नसल्यामुळे अनावरण सोहळा लांबणीवर टाकावा, अशी मागणी करत अनगोळ ग्रामस्थांनी विरोध केला आहे. जिल्हाधिकारी रोशन यांनी आपण प्रत्यक्ष पाहणी करून निर्णय घेवू, असे सांगितले होते. त्यानुसार रात्री अनगोळ येथे कामाची पाहणी केली.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी पंच, कार्यकर्ते आणि लोकांशी अर्धा तास चर्चा केली. त्यानंतर त्यांनी प्रशासनातर्फे उभारण्यात आलेल्या या पुतळ्याचे अनावरण मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे. कुणाच्याही भावना दुखावणार नाहीत. शिष्टाचाराचे उल्लंघन होणार नाही आणि कार्यक्रम सर्वसमावेशक होण्यासाठी आम्ही तयारी करणार आहोत. त्यामुळे रविवारी कोणीही मूर्तीकडे येऊ नये. ़घरातच थांबून सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे. बेळगाव हे शांतताप्रिय शहर आहे. त्यामुळे आम्ही कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी आवश्यक खबरदारी घेणार असल्याचे जाहीर केले.
रविवारी नियोजित कार्यक्रमाला सरकारची परवानगी नाही. त्यामुळे सर्वांनी शांततेत घरात राहावे, असे सांगितले. तर रविवारी कार्यक्रम करण्यासाठी इच्छुक असलेल्या लोकांशीही आपण चर्चा करणार असल्याचे सांगितले.
यावेळी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी जिल्हाधिकार्यांनी केलेल्या चर्चेची माहिती दिली. जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्तांनी पाहणी केली असून लोकांच्या मागणीनुसार मूर्ती अनावरण कार्यक्रम भव्य करण्यात येणार आहे.
रविवारी कोणत्याही प्रकारे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, यासाठी पोलिस बंदोबस्त राखण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे रविवारी सर्व गावची बैठक घेणार असल्याचे जिल्हाधिकारी रोशन यांनी सांगितले आहे. या पाहणीवेळी म. ए. समिती नेते रमाकांत कोंडुसकर, उमेश कुर्याळकर, बी. ओ. येतोजी, विनायक गुंजटकर, राकेश पलंगे, गावातील पंच, कार्यकर्ते उपस्थित होते.