बेळगाव लाईव्ह :भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला मागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकी वरील दोन युवक जागीच ठार झाल्याची घटना बेळगाव तालुक्यातील मुत्यानट्टी गावाजवळील राष्ट्रीय महामार्गावर आज गुरुवारी सकाळी घडली.
अपघातात ठार झालेल्या दुर्दैवी युवकांची नावे सक्षम पाटील (वय 20) आणि सिद्धार्थ बाळू पाटील (वय 23, दोघे रा. छत्रपती शिवाजी गल्ली, गोंडवाड, ता. बेळगाव) अशी आहेत. हे दोघेजण आपल्या दुचाकी वाहनावरून काकती येथील श्री सिद्धेश्वर देवस्थानाकडे निघाले होते.
त्यावेळी मुत्यानट्टीनजीक राष्ट्रीय महामार्गावर मागून येणाऱ्या अज्ञात भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.
ही धडक इतकी जोराची होती की दुचाकीसह रस्त्यावर कोसळलेले सक्षम आणि सिद्धार्थ जागीच गतप्राण झाले. सदर अपघाताची काकती पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पोलीस धडक देणाऱ्या अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत.