बेळगाव लाईव्ह :शारीरिक व मानसिक त्रास देऊन विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या एका प्रकरणातील तिघा आरोपींना बेळगाव 5 व्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने कांही अटींवर जामीन तर उर्वरित दोन आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
जामीन मंजूर झालेल्या आरोपींची नावे फकीरा केदारी जोगानी (सासरा), शांता उर्फ शांता बाई फकीरा जोगानी, (सासू, दोघे रा. सांबरा, ता. जि. बेळगाव) व मल्लवा उर्फ मलप्रभा बसवंत शिंदोळकर (नणंद, रा. निलजी ता. जि. बेळगाव) अशी आहेत.
या प्रकरणाची माहिती अशी की महात्मा फुले गल्ली, सांबरा -बेळगाव येथील सविता मारुती जोगानी हिने पती व घरचे इतर शारीरिक व मानसिक त्रास देत असल्यामुळे गेल्या 28 डिसेंबर 2024 रोजी आत्महत्या केली होती.
त्यामुळे सविताची आई भारता गावडू मोरे (रा. राकसकोप, ता. जि. बेळगाव) यांनी मारीहाळ पोलीस स्थानकात सदरी आरोपींविरुद्ध फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर मारीहाळ पोलिसांनी गेल्या 2 जानेवारी 2025 रोजी उपरोक्त तिघा जणांना अटक करून त्यांना न्यायालयासमोर हजर केले होते.
न्यायालयाने त्यांची हिंडलगा कारागृहात रवानगी केली होती. त्यानंतर आरोपींनी रेग्युलर जामिनासाठी न्यायालयाकडे अर्ज केला होता. त्या अर्जाची दखल घेत 5 व्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने 1 लाख रुपयांचा जामिनदार व इतक्याच रकमेचे हमीपत्र, साक्षीदारांना धमकाऊ नये आणि पोलिसांना तपास कार्यात सहकार्य करावे, अशा अटींवर आरोपींना जामीन मंजूर केला आहे.
अटकपूर्व जामीन : त्याचप्रमाणे याच खटल्यातील आरोपी केदारी फकीरा जोगानी (दीर) व स्मिता केदारी जोगानी (जाऊ, रा. सांबरा) यांना पाचव्या अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
साक्षीदारांना धमका होऊ नये, 1 लाख रुपयांचा जामीनदार व तितक्याच रकमेचे हमीपत्र, तीन दिवसाच्या आत आरोपींनी पोलीस ठाण्यात तपास अधिकाऱ्यांसमोर हजर व्हावे व न्यायालयात सर्व तारखांना हजर राहावे, अशा अटींवर उपरोक्त दोघांना अटकपूर्व जामीर मंजूर करण्यात आला आहे आरोपींच्या वतीने ॲड. शामसुंदर पत्तार, ॲड. लक्ष्मण पाटील, ॲड. मारुती कामाण्णाचे, ॲड. हेमराज बेंचन्नावर, ॲड. शंकर बाळू नाईक व ॲड. सौरव पाटील काम पाहत आहेत.