बेळगाव लाईव्ह : अनगोळ येथे उभारण्यात आलेली छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती आणि स्मारकाच्या उद्घाटन समारंभावरून गेल्या दोन दिवसांपासून वाद निर्माण झाला असून यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
५ जानेवारी रोजी महापौर आणि उपमहापौरांच्या तसेच साताऱ्याचे राजे शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत मूर्ती प्राणप्रतिष्ठापना आणि स्मारकाचा उद्घाटन तसेच लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मात्र २ जानेवारी रोजी घाईघाईत स्मारकाचा वास्तुशांती कार्यक्रम महापौर आणि उपमहापौरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यामुळे स्थानिक नागरिक, शिवशंभूप्रेमींनी नाराजी व्यक्त केली.
यावरून येथील परिस्थिती तणावपूर्ण बनली. ४० गल्लीच्या पंचांच्या उपस्थितीत बैठक घेऊन अशापद्धतीने कार्यक्रम उरकणे योग्य नसल्याचे सांगत थाटामाटात आणि स्थानिकांना विश्वासात घेऊन कार्यक्रम करणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणी आज जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले, घडल्या प्रकाराला जातीय रंग देण्याची आवश्यकता नाही. मूर्ती आणि स्मारकाचे कामकाज पूर्ण होण्याकरिता अद्याप दोन महिन्यांचा कालावधी लागणार असून सदर स्मारकाचे कामकाज सरकारी निधीतून करण्यात आले असून सर्वांना विश्वासात घेऊन उद्घाटन समारंभ केला जाईल. या कार्यक्रमाच्या आमंत्रण पत्रिकेत सर्व शिष्टाचार पाळले जातील आणि योग्य पद्धतीने नावे समाविष्ट केली जातील. यावर कोणत्याही प्रकारचा जातीय रंग देण्याची गरज नाही, नागरिकांनी संयम ठेवावा असे ठाम मत व्यक्त करत उद्घाटनासाठी कोणताही वाद निर्माण होणार नाही, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत केलेल्या कामांबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी आल्या असून, अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे झाल्याचे आढळले आहे. या कामांची सखोल चौकशी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. संबंधित विभागांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी सूचना मंत्री जारकीहोळी यांनी केली.