बेळगाव लाईव्ह : अनगोळ येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचे येत्या ५ जानेवारी रोजी अनावरण करण्यात येणार असून या पार्श्वभूमीवर आज महापौर आणि उपमहापौरांच्या हस्ते वास्तुशांतीची आयोजन करण्यात आले होते. मात्र स्थानिक नागरिकांना विश्वासात न घेता घिसाडघाईने उद्घाटन आणि मूर्ती अनावरणाचा सोहळा उरकण्याचा मनपाच्या धोरणाला विरोध करत बेळगाव शहरातील ४० गल्लीतील पंचांनी आणि श्रीराम सेना हिंदुस्थानच्या नेतृत्वाखाली बैठक घेतली.
या बैठकीनंतर आज दुपारी महापौर सविता कांबळे यांची भेट घेत सदर उद्घाटन सोहळा स्थानिकांना विश्वासात घेऊन करण्यात यावा, तसेच घिसाडघाईने उद्घाटन सोहळा करण्यात येऊ नये असे निवेदन सादर केले.
महानगरपालिकेने घेतलेल्या या निर्णयानंतर शिव-शंभू भक्त, श्रीराम सेना हिंदुस्तान आणि स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शवितात या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. अद्याप या स्मारकाचे कामकाज शिललक आहे. साधारण वर्षभरापूर्वी या परिसरात स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. स्मारकाचे कामकाज सुरु असून निर्धारित वेळेत हे कामकाज पूर्ण झाले नसून यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा करूनही अद्याप हे कामकाज रखडलेले आहे. असे असूनही मनपाने या स्मारकाचा उद्घाटन सोहळा घिसाडघाईने करण्याचा निर्णय घेतल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
धर्मवीर संभाजी महाराज चौक परिसरात नागरिकांसह श्रीराम सेना हिंदुस्थानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले होते. यामुळे येथील वातावरण काही काळ तापले होते. टिळकवाडी पोलिसांनी परिस्थिती हाताळत शिव-शम्भू प्रेमींची समजूत काढली. वातावरण अधिकच तापत असल्याचे लक्षात येताच या परिसरात पोलीस फौजफाटा तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सुमारे ८० हुन अधिक पंचांनी याविरोधात ठराव केला असून स्वाक्षऱ्या असणारे निवेदन महापौरांकडे सोपविण्यात आले आहे. यासंदर्भात महापौरांनी दिलेल्या माहितीनुसार ५ जानेवारी रोजी मूर्ती अनावरण सोहळा आयोजिण्यात आला आहे. तत्पूर्वी आजचा मुहूर्त शुभ असल्याने आज वास्तुशांतीचा सोहळा साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
काही कालावधीपूर्वीदेखील या स्मारकाच्या उदघाटन सोहळ्याचा घाट घालण्यात आला होता. त्यावेळीही स्थानिकांनी यासाठी विरोध दर्शविला. मध्यंतरी सुरु झालेल्या निवडणुकांमुळे हे उद्घाटन रखडले. मात्र पुन्हा या स्मारकाच्या उदघाटनाचा घाट घालण्यात आल्याने तसेच स्थानिक रहिवाशांची मते विचारात न घेतल्याने पुन्हा एकदा यावरून नाराजीचा सूर उमटत आहे.
सदर उद्घाटन सोहळा पुढे ढकलण्यात यावा, स्थानिक नागरीक, शिवप्रेमी, शंभूप्रेमींची मते विचारात घेण्यात यावीत, सर्वसंमतीने थाटामाटात सोहळा साजरा करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून महापौर आणि उपमहापौरांना करण्यात आली आहे.