बेळगाव लाईव्ह : अनगोळ येथे उभारण्यात आलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या अनावरण सोहळ्याच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या परिस्थितीवर शांतता आणि सौहार्दतेने तोडगा काढता येईल, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी स्पष्ट केले आहे.
या विषयावर जिल्हाधिकाऱ्यांनी महापौर, उपमहापौर, आणि बेळगाव दक्षिणचे आमदार यांच्या सह पंच भाजप कार्यकर्ते यांच्यासोबत बैठक घेतली. त्यांनी या प्रकरणाचा सखोल आढावा घेत शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्याचा निर्धार व्यक्त केला.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचा अनावरण सोहळा रविवार, ५ जानेवारी रोजी होणार आहे. मात्र, या सोहळ्याला काही स्थानिक संघटनांनी सोहळा इतक्या घाईगडबडीत आयोजित करण्यास आक्षेप घेतला असून, अधिक व्यापक प्रमाणावर व शिस्तबद्ध पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित करावा अशी मागणी केली आहे.
महापौर, उपमहापौर आणि आमदारांनी मात्र कार्यक्रम नियोजित वेळेतच आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी स्थानिक पंच, नगरसेवक, नागरिक, आणि कंत्राटदार यांच्या सोबत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली व स्मारक अनावरणाचे महत्त्व स्पष्ट केले. महाराष्ट्रातील मान्यवरांना या कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आले असून, अनावरण सोहळा लांबणीवर टाकल्यास त्यांच्या मानमर्यादेला धक्का लागेल, असे त्यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी संबंधित संघटनांचे म्हणणे, स्थानिक लोकप्रतिनिधींची भूमिका, आणि कागदपत्रांचा आढावा घेतला. स्मारकामुळे सार्वजनिक रस्त्यावर अडथळा निर्माण होत नसल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, छत्रपती संभाजी महाराज हे महान व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांचा मानसन्मान राखणे हे आमचे कर्तव्य आहे. स्मारकाच्या अनावरणाबाबत निर्माण झालेली परिस्थिती सुटण्यासारखी आहे, परंतु शांततेच्या मार्गाने आणि सहिष्णुतेने हा प्रश्न हाताळला गेला पाहिजे. अनावरण कार्यक्रमाच्या नियोजनासाठी कमी वेळ असल्यामुळे आम्हाला जलदगतीने निर्णय घ्यावा लागतो आहे. स्थानिकांच्या सहकार्याने हा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडेल, याची आम्हाला खात्री आहे. मी स्वतः स्मारकाची पाहणी करून याबाबतचा अंतिम निर्णय घेईन.
कोणीही व्यथित होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. बेळगाव जिल्ह्यातील जनता नेहमीच शांतता आणि सौहार्दाचे उदाहरण घालून देते, असे सांगत जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणातही तशीच भूमिका घेण्याचे आवाहन केले. प्रशासनाच्या निर्णयाला सर्वांनी पाठिंबा द्यावा, हीच माझी अपेक्षा आहे. स्मारक अनावरणाचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल, याचा मला विश्वास आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सदर स्मारकाचा अनावरण सोहळा नियोजित वेळेत पार पडणार की पुढे ढकलला जाणार, याबाबत प्रशासनाचा अंतिम निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.