बेळगाव लाईव्ह : गेल्या दोन चार दिवसांपूर्वी वन खात्याने विशेष मोहीम राबवत शेतीचे नुकसान करणाऱ्या हत्तींला जर बंद करून शिमोगाला रवाना केलेले असताना पुन्हा खानापूर तालुक्यात हत्तींचा कहर सुरू झाला आहे.
खानापूर पासून नजीक असलेल्या, व खानापूर नंदगड-मार्गावरील कौंदल या ठिकाणी, पुन्हा हत्तींचे आगमन झाले आहे. कौंदल येथील नागरिक व सामाजिक कार्यकर्ते नागेश भोसले, यांच्या शेतातील केळीची झाडे, नारळ, सागवान ची लहान झाडे तसेच भाजीपाल्याचे अतोनात नुकसान केले आहे. त्यामुळे त्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नागेश भोसले नेहमीप्रमाणे आज मंगळवार दिनांक 14 जानेवारी रोजी गावाला लागून असलेल्या आपल्या शेतामध्ये गेले असता त्यांना आपल्या शेतातील नारळाची व केळीची झाडे मुळासकट उपटून काढून, मोडतोड केलेली दिसली.
तसेच त्यांनी आपल्या शेतीमध्ये भाजीपाल्याची लागवड केली होती. त्याचे सुद्धा नुकसान केल्याचे दिसून आले. त्यांनी बारकाईने पाहिले असता त्यांना त्या ठिकाणी हत्तींच्या पायांचे ठसे आढळून आले. यामध्ये त्यांना हत्तींचे लहान मोठे, वेगवेगळ्या तीन प्रकारचे ठसे दिसून आले. त्यामुळे त्यांनी अंदाज व्यक्त केला आहे की, आपल्या शेतामध्ये तीन हत्तीनी येऊन नुकसान केले आहेत. याची माहिती त्यांनी वन खात्याला दिली आहे.
चार दिवसांपूर्वी कौंदल पासून काही अंतरावर असलेल्या, जळगे या ठिकाणी, शिमोगा येथून हत्ती मागवण्यात आली होते.
व या परिसरात शेतीचे नुकसान करणाऱ्या हत्तीला वन खात्याकडून जेरबंद करण्यात आले होते. ही घटना ताजी असतानाच परत कौंदल या ठिकाणी हत्ती आल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरले आहे.