बेळगाव लाईव्ह : सावकारी, गहाणवट तसेच इतर वित्तीय संस्थांच्या माध्यमातून कर्ज घेतल्यानंतर अवाजवी व्याजदर आकारण्यात येत असल्याने अनेक कर्जदारांनी आत्महत्येचे पाऊल उचलले आहे. काहींनी तक्रारारही केली आहे. याची दखल घेत सहकार खात्याने बेकायदेशीर पद्धतीने कर्जावर व्याज आकारणाऱ्या संस्थांवर कारवाईचा इशारा दिला आहे.
कर्नाटक सावकारी अधिनियम 1961 व जास्त व्याज आकारण्यास प्रतिबंध करणाऱ्या 2004 च्या कायद्यांतर्गत जिल्ह्यातील सर्व सावकारी/गहाणवट/आर्थिक संस्थांना निश्चित व्याजदरांवर पालन करण्याचा आदेश देण्यात आला असून सावकारी अधिनियम 1961 च्या कलम 28(1) आणि 2004 च्या जास्त व्याज आकारण्यास प्रतिबंध करणाऱ्या कायद्याच्या आधारे व्याजदर मर्यादा ठरवण्यात आली आहे. सुरक्षित कर्जांसाठी व्याजदर 14 टक्क्यांपर्यंत आणि असुरक्षित कर्जांसाठी १६ टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवणे अनिवार्य आहे.
यासंबंधित नियमांचे पालन करण्यासाठी संस्थांनी आपल्या कार्यालयांच्या आतील आणि बाहेरील ठिकाणी स्पष्ट व ठळक पद्धतीने माहितीपट लावणे बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास अशा संस्थांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, तसेच त्यांचा परवाना रद्द केला जाईल, असा इशारा बेळगाव जिल्हा सहकार संस्थांचे उपनिबंधक रवींद्र पाटील यांनी दिला आहे. जनतेला अशा बेकायदेशीर व्याज आकारणाऱ्या संस्थांविरोधात तक्रार दाखल करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. तक्रारी जिल्हा सहकार विभागाकडे सादर केल्यास कारवाईची खात्री देण्यात आली आहे.