बेळगाव लाईव्ह :सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक विजय पाटील यांच्यातर्फे स्थापित आणि माजी महापौर विजय मोरे यांच्यातर्फे चालविला जाणाऱ्या बेळगावच्या शांताई वृद्धाश्रमातील आज्जिंचे दर्शन आज झी चॅनल वरील सारेगमप या संगीतमय कार्यक्रमात होणार आहे. १ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता या कार्यक्रमाचे प्रक्षेपण होणार असून प्रत्येक बेळगावकराला अभिमान वाटेल अशीच ही घटना ठरणार आहे.
अतिशय सुंदर आणि घरच्यासारखे वातावरण तसेच रिसॉर्टचा अनुभव देणारा बामणवाडी येथील शांताई वृद्धाश्रम अनेकांचे कुतूहल ठरतोय. येथील आजी-आजोबा प्रामुख्याने चर्चेत आले ते त्यांच्या इंस्टाग्राम वरील रिल्समुळे आणि हे रिल्स पाहून येथील आजींना थेट झी सारेगामापा या कार्यक्रमांमध्ये बोलावणे आले.
आजींनीही आनंदाने या कार्यक्रमात सहभाग घेतला आणि आपल्या जीवनातील एक आनंदमय प्रवासाचे दर्शनच या कार्यक्रमात घडवले आहे.
मनात दुःख आहे मात्र चेहऱ्यावर हास्य फुलवून कसे जगता येते याचे दर्शन घडवणाऱ्या या आजींना आता टीव्ही चॅनलवर पाहण्याची संधी बेळगावकरांना उपलब्ध झाली आहे.
आश्रमाचे कार्याध्यक्ष विजय मोरे यांनी मुंबईपर्यंतचा प्रवास घडवून झी चॅनेलच्या कार्यक्रमात आजींचा सहभाग घडून आणला असून आजींनी आपले अनुभव कथन करून अनेक गायक गायिका आणि कार्यक्रमातील जजीसच्या डोळ्यात पाणी आणले.
त्यामुळे हा कार्यक्रम सर्वांनाच पहावा लागणार आहे.
बेळगावच्या या आश्रमातील आजी आजोबांची ही यशोगाथा प्रत्येक बेळगाव करासाठी अभिमानाची असेल. लहान मुले तरुण आणि युवक युवतीच्या कायमच्या उपस्थितीने नेहमीच चर्चेत राहणारा हा आश्रम आणि तेथील आजी आजोबा आता पुन्हा एकदा एका नव्या यशामुळे सर्वत्र चर्चेत आले आहेत.