बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन ९ डिसेंबर २०२४ रोजी बेळगाव येथे सुरु होणार आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित केला आहे. यासाठी बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी द्यावी, यासंदर्भात कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्याशी चर्चा करावी, अशा मागणीचे निवेदन शिवसेना उबाठा गटाच्या वतीने कोल्हापूरचे जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना सादर करण्यात आले आहे.
गेल्या ३ ते ४ वर्षांत कर्नाटक सरकारने दडपशाहीच्या स्वरूपात महाराष्ट्र एकीकरण समितीला महामेळावा घेण्यास परवानगी देणे बंद केले आहे. तसेच, महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावला जाण्यास बंदी घालण्यात येते. हे लोकशाहीला मान्य नसलेले आहे, असे शिवसेनेच्या वतीने म्हटले आहे. याच कालावधीत कर्नाटकातील अनेक मंत्री महाराष्ट्रात व कोल्हापुरात येतात आणि महाराष्ट्र सरकार त्यांना कोणतीही बंदी घालत नाही.
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना बेळगावमध्ये होणाऱ्या ९ डिसेंबरच्या महामेळाव्यास परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच, महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावला जाण्यास बंदी घालू नये, अशी निवेदनात स्पष्ट केली आहे. याशिवाय, जिल्हाधिकारी बेळगाव यांनी परवानगी दिली नाही तर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर दि. ९ डिसेंबर रोजी आंदोलन करण्यात येईल आणि कर्नाटकी वाहनांना महाराष्ट्र सीमेवर अडवले जाईल, असेही नमूद करण्यात आले आहे.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख, उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख सुनील मोदी, रविकिरण इंगवले, शहर समन्वयक हर्षल सुर्वे, विशाल देवकुळे, जिल्हा महिला संघटक सौ. प्रतिज्ञा उत्तुरे आदींसह शिवसेना उबाठा गटाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. प्ले