बेळगाव लाईव्ह : बेळगाव येथे 26 डिसेंबर 2024 रोजी होणाऱ्या काँग्रेस अधिवेशनाच्या तयारीची कर्नाटक काँग्रेस प्रभारी रणदीप सिंह सुरजेवाला यांच्यासह उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी आज पाहणी केली.
बेंगलोरहून विशेष विमानाने सुरजेवाला आणि शिवकुमार हे आज सोमवारी सकाळी बेळगावला दाखल झाले होते. शहरातील सीपीएड मैदानावर येत्या 27 रोजी होणाऱ्या जाहीर सभेच्या स्थळाची पाहणी आणि तयारीचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. टिळकवाडी, बेळगाव येथील वीरसौध येथे 26 डिसेंबर 1924 रोजी महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसचे अधिवेशन झाले होते.
त्या अधिवेशनाच्या शतकपूर्ती निमित्त बेळगावात काँग्रेसचे अधिवेशन भरवण्यात येणार आहे. वीरसौध येथेच हे 26 रोजी काँग्रेसचे अधिवेशन भरवणार आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने देशभरातून काँग्रेसचे खासदार, मंत्री आणि अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणी सदस्य बेळगाव दाखल होणार आहेत.
देशभरातून येणाऱ्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह अतिमहनीय व्यक्तींची सोय, जाहीर सभेची तयारी याशिवाय अधिवेशनाच्या तयारीची पाहणी आज सुरजेवाला आणि शिवकुमार यांनी केली. बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि महिला बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी या अधिवेशनाच्या तयारी बाबत नुकतीच माहिती दिली आहे. काल रविवारी राज्याचे कायदामंत्री एच. के. पाटील यांनी यांनी देखील बेळगावला भेट देऊन तयारीची माहिती घेतली होती.
कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने बेळगावात होणाऱ्या या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विविध नेत्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या कमिट्या बनवण्यात आल्या असून प्रत्येकावर वेगवेगळी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. येत्या 26 रोजी होणाऱ्या काँग्रेस अधिवेशनात सहभागी झाल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या त्यादिवशी रात्री बाहेर येणाऱ्यांसाठी मेजवानी देणार आहेत. याशिवाय जवळपास 8 कोटी रुपये खर्च करून बेळगाव शहराला विद्युत रोषणाईने सजवण्यात आले आली असून म्हैसूरच्या धर्तीवर बेळगावची सजावट करण्यात आली आहे. एकूणच बेळगावच्या या अधिवेशनाला ऐतिहासिक बनवण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकारने काँग्रेसने चालवला आहे.
बेळगावमध्ये काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन झाले. त्यावेळी जवाहरलाल नेहरू व गंगाधरराव देशपांडे हे दोघे जनरल सेक्रेटरी होते. त्यांनी महात्मा गांधीजींना निमंत्रित करून त्यांच्या अध्यक्षतेखाली बेळगावमध्ये काँग्रेसचे अधिवेशन भरवले होते असे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी आजच्या बेळगाव भेटी प्रसंगी सांगितले. बेळगाव मधूनच स्वातंत्र्य चळवळीचा प्रारंभ झाला. त्यामुळे आम्ही बेळगाव मधून आम्ही चळवळ सुरू करणार असल्याचे देखील डी. के. शिवकुमार म्हणाले.