बेळगाव लाईव्ह : माजी मुख्यमंत्री दिवंगत एस.एम. कृष्णा यांच्या स्मरणार्थ गुरुवारी अधिवेशनात बोलताना उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री डी.के. शिवकुमार यांनी एस.एम. कृष्णा यांना आधुनिक कर्नाटकाच्या निर्मितीचे शिल्पकार म्हणून गौरवले.
आपल्या अनुभवांचे वर्णन करताना शिवकुमार म्हणाले की, माझ्या राजकीय प्रवासात एस.एम. कृष्णा यांनी वडिलांसारखा मार्गदर्शन केले. माजी मुख्यमंत्री बंगारप्पा यांच्या सूचनेनुसार मी एस.एम. कृष्णा यांच्याकडे गेलो आणि त्यांच्या नेतृत्वाखाली माझा राजकीय विकास घडला. त्यावेळी त्यांच्या कुटुंबासोबतही घनिष्ठ संबंध निर्माण झाले.
९२ वर्षांचे यशस्वी आयुष्य जगलेल्या एस.एम. कृष्णा यांच्या निधनाने देशाने एक मोठे नेतृत्व गमावले आहे. साधनेशिवाय मृत्यू हा मृत्यूसाठी अपमान आहे आणि आदर्शांशिवाय जीवन जगणे हे जीवनासाठी अपमान आहे, असे स्वामी विवेकानंद यांची वाणी उद्धृत करताना शिवकुमार यांनी एस. एम. कृष्णा यांच्या कार्याचे स्मरण केले.
राज्यात आयटी धोरणाची अंमलबजावणी, ग्रामपंचायतींच्या अनुदानात रु. १ लाखांवरून ५ लाखांपर्यंत वाढ, जिल्हा पंचायतींना अधिकारवाढ (बेलूर घोषणा), शेतकऱ्यांना चंदन लागवडीचा अधिकार, कर्नाटक राज्य पेय निगम स्थापन, शालेय विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजन योजना, बेंगळुरू मेट्रो, बेंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळ, तसेच सरकारी शाळांची उभारणी यांसारख्या अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे श्रेय एस.एम. कृष्णा यांना जाते. शिक्षण हे सुसंस्कृत जीवनाचे साधन आहे, या विश्वासाने एस. एम. कृष्णा यांनी राज्यातील शिक्षण व्यवस्थेचा दर्जा उंचावला. माजी मुख्यमंत्री केंगळ हनुमंतय्या यांच्या धर्तीवर त्यांनी विकास आणि रोजगारासाठी सौधांची निर्मिती केली, असेही शिवकुमार यांनी नमूद केले.
माजी आमदार आर. नारायण आणि जयण्णा एस. यांच्या निधनाबद्दल विधानसभेत शोकप्रस्ताव
बेळगाव लाईव्ह : माजी आमदार आर. नारायण आणि जयण्णा एस. यांच्या निधनाबद्दल गुरुवारी हिवाळी अधिवेशनात शोक व्यक्त करून ठराव संमत करण्यात आला.
विधीमंडळाच्या कामकाजाच्या सुरुवातीला सभापती यू. टी. खादर यांनी शोकप्रस्ताव मांडला. त्यांनी माजी आमदार आर. नारायण यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत सांगितले की, ते ७ जुलै १९४३ रोजी तुमकुर येथे जन्मले होते. बी.एस्सी. आणि विधी पदवी प्राप्त केलेल्या नारायण यांनी वकिली व्यवसाय केला. त्यांनी प्रथमच बेळगाव विधानसभेच्या क्षेत्रातून ९व्या विधानसभेत प्रवेश केला होता आणि नंतर १०वी व ११वी विधानसभेसाठी पुन्हा निवडून आले. १२ डिसेंबर गुरुवारी सकाळी त्यांचे निधन झाले.
सभापतींनी जयण्णा एस. यांच्या योगदानाचेही कौतुक केले. ते ९ सप्टेंबर १९५१ रोजी कोळेगाळ येथे जन्मले. ते शेती आणि रेशीम व्यवसायिक होते. १९९४ मध्ये ९व्या विधानसभेसाठी निवडून आले आणि २०१३ मध्ये १४व्या विधानसभेतही निवड झाले. जयण्णा एस. यांचे निधन १० डिसेंबर रोजी झाले.
शोकप्रस्तावावर उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री डी. के. शिवकुमार यांनी माजी आमदारांच्या कार्याचे स्मरण करून सांगितले की, आर. नारायण काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. जयण्णा एस. यांनीही विधायक कार्यात मोलाचे योगदान दिले. विरोधी पक्षनेते आर. अशोक, कृषी मंत्री चेलूवरायस्वामी, समाज कल्याण मंत्री एच. सी. महादेप्पा यांसह इतर आमदारांनीही शोकप्रस्तावावर आपले विचार व्यक्त केले. शेवटी, दिवंगत नेत्यांच्या सन्मानार्थ सभागृहात एक मिनिट मौन पाळण्यात आले.