बेळगाव लाईव्ह : गुंफण साहित्य परिषद आणि शिवस्वराज्य संघटना खानापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता.२२) खानापूर येथील लोकमान्य भवन आयोजित करण्यात आलेल्या गुंफण सदभावना मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीला वेग आला आहे. तसेच संमेलनाला महाराष्ट्र, गोवा व सीमा भागातील अनेक मान्यवर साहित्यिक उपस्थित राहणार आहेत. त्यामूळे अनेक ठिकाणी फलक लावण्यासह पताका व ध्वज लावण्यात आले आहेत तसेच शाळा आणि महाविद्यालयात संमेलना बाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे हे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या कमिटीचे अध्यक्ष होते. तसेच त्यानी अतिशय चांगल्या प्रकारे संशोधन करून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी आवश्यक तो पाठपुरावा केला आहे. पठारे यांच्या ताम्रपट या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला असून दिवे गेलेले दिवस, रथ, चक्रव्युह, टोकदार सावलीचे वर्तमान, माणुसकीचे स्वागत त्यांची इतर पुस्तके व कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्र सरकार व इतर संस्थांचे देखील त्यांना पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
डॉ. विनोद बाबर
कराड येथील डॉ. विनोद बाबर हे उच्चशिक्षित आहेत तसेच त्यांनी आपल्या व्याख्यानातून महाराष्ट्रातील युवा पिढीला यशाचा शिवमंत्र देण्याचा प्रयत्न करीत आहे. शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यासात मंडळाचे सदस्य, कराड येथील कृष्णा फाउंडेशन या शैक्षणिक संस्थेमध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. आतापर्यंत महाराष्ट्र व इतर राज्यात बाराशे हुन अधिक वीज प्रबोधन व प्रेरणादायी कार्यक्रम त्यांनी सादर केले आहेत. आनंद मनाचा व यशाचा शिवमंत्र हे त्यांचे सदर प्रसिद्ध असून साहित्य संमेलनावेळी चला शिवरायांना समजून घेऊया या विषयावर ते व्याख्यान देणार आहे.
…
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक
केंद्रीय ऊर्जा आणि पर्यटन मंत्रालयाचे मंत्री असलेले श्रीपाद नाईक सहाव्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. तसेच ते दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्री झाले असून त्यांनी विविध खात्याचा कारभार चांगल्या प्रकारे सांभाळला आहे. मराठी भाषा आणि साहित्याशी त्यांची
जवळीक आहे. स्वच्छ प्रतिमा असलेले आणि समाजसेवेसाठी समर्पित असलेले बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून त्यांना ओळखले जाते तसेच गोव्यातील महत्त्वाचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे.
गोव्यातील कवयित्री रजनी रायकर यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवी संमेलन होणार आहे. या कवी संमेलनात डॉ. चंद्रकांत पोतदार, चित्रा क्षीरसागर, रामचंद्र कांबळे, कृष्णा पारवाडकर, प्रकाश क्षीरसागर, महादेव खोत, चंद्रशेखर गावस, स्मिता किल्लेदार, स्वाती बाजारे, सु. ना. गावडे, लहूराज दरेकर, अमृत पाटील, कविता फडके, गुरुनाथ किरमीटे, प्राचार्य अरविंद पाटील सहभागी होणार आहेत.
..
दुपारी १ वाजता संगीत विशारद मष्णू चोर्लेकर व सतीश गच्ची यांच्यातील तबला जुगलबंदीचा कार्यक्रम होणार आहे. तर २.३० वाजता ‘आजच्या पत्रकारितेपुढील आव्हाने’ या विषयावर परिसंवाद होत आहे. ज्येष्ठ पत्रकार विकास अध्यापक हे परिसंवादाचे अध्यक्ष असून यामध्ये स्तंभलेखक अनिल आजगावकर, पत्रकार वासुदेव चौगुले व पत्रकार – रंगकर्मी राजीव मुळ्ये सहभागी होणार आहेत तर
दुपारी ३.३० वाजता प्रेरणादायी वक्ते व प्रवचनकार प्रा. डॉ. विनोद बाबर यांचे ‘छत्रपती शिवाजी महाराज समजून घेताना’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. त्यानंतर संमेलनाचा समारोप समारंभ होणार असून याप्रसंगी स्थानिक मान्यवरांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बृहन्महाराष्ट्र पुरस्कार विजेते लेखक गजानन देसाई (गोवा), कोल्हापूर येथील राजर्षी शाहू महाराज अध्यासनाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. जे के पवार, ग्रामीण साहित्यिक बबन पोतदार, भोगावती साखर कारखान्याचे संचालक बी. ए. पाटील उपस्थित राहणार आहेत.