Wednesday, December 18, 2024

/

मराठी भाषिकांचा महामेळावा शिनोळीत आयोजित करा -शिवसेनेचे निमंत्रण

 belgaum

बेळगाव लाईव्ह :दरवर्षीप्रमाणे बेळगाव मधील कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी (9 डिसें.) महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मराठी भाषिकांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यास स्थानिक जिल्हा प्रशासन पर्यायाने कर्नाटक सरकारने परवानगी नाकारली असली तरी महाराष्ट्र एकीकरण समितीने आपला महामेळावा महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील महाराष्ट्र हद्दीतील शिरोळी येथे आयोजित करून आपला निषेध नोंदवावा, असे निमंत्रण महाराष्ट्रातील शिवसेनेने (उ.बा.ठा.) दिले आहे.

बेळगाव मधील यंदाच्या कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी (9 डिसें.) महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मराठी भाषिकांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यास स्थानिक जिल्हा प्रशासन पर्यायाने कर्नाटक सरकारने परवानगी नाकारली. महाराष्ट्रातील नेत्यांना देखील बेळगावमध्ये प्रवेश बंदी करण्यात आली. याची गांभीर्याने दखल घेत महाराष्ट्रातील शिवसेनेने (उ.बा.ठा.) कर्नाटक सीमेवरील महाराष्ट्रातील शिनोळी येथे बेळगाव सीमाभागातील मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित करावा त्यासाठी शिवसेना सर्वतोपरी सहकार्य करेल असे निमंत्रण बेळगावच्या महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष आणि सरचिटणीसांना देण्यात आले आहे, अशी माहिती कोल्हापूर जिल्हा शिवसेनेचे नेते विजय शामराव देवणे यांनी दिली.

शिनोळी येथे सीमाभागातील मराठी भाषिकांचा मेळावा आयोजित करण्याचे निमंत्रण देणारे पत्र देखील शिवसेना नेते विजय देवणे यांनी महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगावचे अध्यक्ष दीपक दळवी यांना धाडले आहे. याबद्दल स्वतःच्या व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून बोलताना देवणे म्हणाले की, बेळगावमध्ये कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे.

दरवर्षीप्रमाणे या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे गेल्या 9 डिसेंबर रोजी मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित करण्यास परवानगी द्यावी अशी विनंती महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी महामेळाव्याच्या आयोजनास परवानगी नाकारली. त्याचप्रमाणे 144 कलमान्वये जमाबंदीचा आदेश जारी केला होता.Vijay devne

याखेरीस महाराष्ट्रातील सर्व नेत्यांना विशेष करून बेळगावमध्ये प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली होती. हे लक्षात घेता कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्यावतीने आम्ही सर्वजण महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी आणि सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर यांना विनंती केली आहे की बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी महामेळाव्यास परवानगी नाकारली असली तरी त्यांनी सीमा भागातील मराठी भाषिकांच्या भावना व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र -कर्नाटक सीमेवरील महाराष्ट्राच्या हद्दीतील शिनोळी येथे महामेळावा आयोजित करावा. या मेळाव्याच्या आयोजनासाठी कोल्हापूर जिल्हा शिवसेना विशेष सहकार्य करेल.

या महामेळाव्याच्या माध्यमातून आपल्याला कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवता येईल. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने नोंद घ्यावी यासाठी बेळगाव सीमाभागासंदर्भातील कांही ठरावही या मेळाव्यात मांडता येतील असे सांगून यासाठी आम्ही बेळगाव महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी आणि सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर यांना शिनोळी येथे महामेळाव्याचे आयोजन करावे असे लेखी निमंत्रणही दिले आहे, अशी माहिती विजय देवणे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.