बेळगाव लाईव्ह : सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारची उदासीनता आणि सीमावासीयांकडे सरकारचे होत असलेले दुर्लक्ष यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे नेते उदय सामंत आणि काही पदाधिकारी बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या मराठी भाषिक महामेळाव्याला उपस्थित राहणार होते, यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार नेते संजय राऊत यांनी टोला लगावला आहे.
मी वारंवार हे सांगत आलो आहे. एकनाथ शिंदे हे राज्यात मंत्री असताना चंद्रकांत पाटील हे राज्यात मंत्री असताना त्यांच्याकडे सीमा भागाचा विशेष कार्यभार होता. पण एकनाथ शिंदे यांनी कधीही बेळगावात जाऊन त्यांनी सीमा भागातील लोकांची गाऱ्हाणी ऐकली नाहीत. किंवा मंत्री म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लोकांशी संवाद साधून त्यांच्या गरजा काय आहेत? हे समजून घेतलं नाही. मी तिकडे गेलो होतो.
मला तिथं अटक झाली. आमच्या सरकारच्या काळात मी वारंवार तिकडे गेलो. तेव्हा मला अटक झाली माझ्यावर खटले दाखल झाले. पण मी घाबरलो नाही. पण आपल्याला अटक होईल. पोलिसांचे दंडुके खावे लागतील. म्हणून हे तिकडे गेले नाहीत. अटकेच्या भीतीने हे तिकडे गेले नाहीत, असं संजय राऊत म्हणाले.
बेळगावच्या धर्मवीर संभाजी महाराज चौकात कर्नाटक पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह 100 पेक्षा जास्त पोलीस धर्मवीर संभाजी महाराज चौकात दाखल होऊन मराठी भाषिकांची धरपकड करण्यात आली.
महामेळाव्याला परवानगी नाकारल्यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीने संभाजी महाराज चौकात एकत्र कर्नाटकमध्ये काँग्रेसचे राज्य आहे, ही पळवाट नाही, असे सांगून बेळगावमधील मराठी भाषिकांच्या मागे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ठामपणे उभा आहे आणि तिथं आमचे शिवसैनिक महामेळाव्यात सहभागी होतील, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले.