बेळगाव लाईव्ह :उच्च न्यायालयाची स्थगिती असतानाही बेळगाव रिंग रोड निर्मितीच्या अनुषंगाने शेतामध्ये संरेखनाचे दगड बसवण्यासाठी आलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांनी हुसकावून लावल्याची घटना आज शनिवारी झाडशहापूर येथे घडली.
बेळगाव शहरासाठी रिंग रोड तयार करण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखण्यात आली आहे. तथापी यामुळे सुपीक पिकाऊ जमीन नष्ट होणार असल्यामुळे बेळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा रिंग रोड प्रकल्पाला तीव्र विरोध आहे. त्या अनुषंगाने झाडशहापुर येथील शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन आपल्या भागात या प्रकल्पाला स्थगिती मिळवली आहे. या पद्धतीने न्यायालयाचा स्थगिती आदेश असतानाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कर्मचारी आज झाडशहापुर येथे दाखल झाले आणि त्यांनी मोजमाप करून शेत जमिनीमध्ये संरेखनाचे दगड बसवण्यास सुरुवात केली.
शेतातील पिकामध्ये खोदकाम करून दगड बसवले जात असल्याचा प्रकार निदर्शनास येताच संतप्त शेतकरी त्या ठिकाणी जमा झाले व त्यांनी सुरू असलेले काम बंद पाडले. तसेच शेतजमिनीत बसवलेले खांब काढून घेण्यास भाग पाडले.
दगड काढण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांनी त्या कर्मचाऱ्यांना जाब विचारला. त्यावेळी त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांकडे बोट दाखवून त्यांच्या आदेशावरून आम्ही संरेखनाचे दगड बसवण्याचे काम करत आहोत असे सांगितले. तेंव्हा न्यायालयाचा स्थगिती आदेश असताना तुमचे साहेब हे काम करायला तुम्हाला कसे काय सांगतात? न्यायालयापेक्षा तुमचे साहेब मोठे आहेत का? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला.
तसेच न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल पोलिसात तक्रार नोंदवण्याचा इशारा दिला. तेंव्हा त्या कर्मचाऱ्यांनी उडवा उडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्यानंतर आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी बांधून घालण्याचा धाक दाखवताच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या त्या कर्मचाऱ्यांनी तेथून काढता पाय घेतला.