बेळगाव लाईव्ह : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्याचा प्रयत्न केलेल्या नराधमाला पोक्सो न्यायालयाने जन्मठेप आणि ३० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. सुभाष महादेव नाईक (वय २१, रा. वन्नूर, ता.बैलहोंगल) असे नराधम युवकाचे नाव आहे.
मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शाळेच्या पटांगणात अडीच वर्षाची मुलगी खेळत असताना सुभाषने तिला शाळेच्या संरक्षण भिंतीजवळ बोलावून घेऊन तिच्यावर बलात्कार केला. तसेच गालाचा चावा घेऊन जखमी केले. तसेच गळाही दाबला. खड्डा खोदून त्यामध्ये तिला पुरून खून करण्याचा प्रयत्न करताना सुभाषला पकडण्यात आले.
या प्रकरणी नेसरगी पोलीस ठाण्यात सुभाषच्या विरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तपास अधिकारी एच. संगनगौडर यांनी अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालय विशेष जलदगती पोक्सो न्यायालयात दोषारोप दाखल केला. त्याठिकाणी ३३ साक्षीदार, ४६ पुरावे, आणि १३ मुद्देमाल तपासण्यात आले.
सुभाषवर आरोप सिद्ध झाल्याने न्यायाधीश सी. एम. पुष्पलता यांनी त्याला जन्मठेप आणि ३० हजार रुपयांचा दंड ठोठावला. पीडित मुलीला जिल्हा कायदा सेवा प्राधिकारणाने १ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा आदेशही बजावला. सरकारी वकील म्हणून एल. व्ही. पाटील यांनी काम पाहिले.