बेळगाव लाईव्ह :भारतीय जनता पक्षाने वारंवार या देशातील महिलांचा अपमान केला आहे. भाजपचा चेहरा, वर्तणूक चरित्रहीन आहे. नारी विरोधी, युवा विरोधी, शेतकरी विरोधी, दलित, आदिवासी आणि शोषित विरोधी असा भाजपचा चेहरा आहे, अशी टीका अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (एआयसीसी) सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी केली.
बेळगाव विमानतळावर आज सोमवारी सकाळी ते पत्रकारांशी बोलत होते. बेळगावमध्ये काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन झाले त्यावेळी जवाहरलाल नेहरू व गंगाधर राव देशपांडे हे दोघे जनरल सेक्रेटरी होते त्यांनी महात्मा गांधीजींना निमंत्रित करून त्यांच्या अध्यक्षतेखाली बेळगावमध्ये काँग्रेसचे अधिवेशन केले. त्यामुळे बेळगाव हे हिंदुस्थानातील एक अविस्मरणीय स्थळ बनले आहे.
बेळगाव मध्ये 1924 मध्ये झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनापासून स्वातंत्र्य चळवळीचा प्रारंभ झाला. या अधिवेशनाच्या माध्यमातून गांधीजींनी बेळगावमधून देशातील नव्या अध्यायाला चालना दिली. या आंदोलनाद्वारे जाती, धर्म वगैरे सर्व भेदभाव बाजूला सारून स्वातंत्र्य लढ्याला आरंभ करण्यात आला. बेळगावमध्ये महात्मा गांधीजी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे अधिवेशन झाले. आता पुन्हा एकदा बेळगाव मध्ये येत्या 26 व 27 रोजी काँग्रेस अधिवेशनाचा शताब्दी कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे, असे सुरजेवाला यांनी पुढे सांगितले.
बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे विधान परिषद सभागृहात राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि आमदार सी. टी. रवी यांच्या बाबतीत जी घटना घडली त्या संदर्भात बोलताना सुरजेवाला म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने वारंवार या देशातील महिलांचा अपमान केला आहे. भाजपचा चेहरा, वर्तणूक चरित्रहीन आहे. नारी विरोधी, युवा विरोधी, शेतकरी विरोधी, दलित, आदिवासी आणि शोषित विरोधी असा भाजपचा चेहरा आहे. ज्या पद्धतीने अश्लील वर्तन आणि भाषेचा वापर भाजप नेते पुन्हा महिला मंत्र्यांच्या बाबतीत करू लागले आहेत त्याची फक्त निर्भत्सना करून चालणार नाही तर माझी कर्नाटक सरकारला विनंती आहे की त्यांनी अशा गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करावी.
राहुल गांधी ‘ड्रग एडिक्ट’ आहेत असाच जो आरोप केला जात आहे, त्याबद्दल आपले मत काय? या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना जे कोण हा आरोप करत आहेत त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. हा आरोप म्हणजे लक्ष विचलित करण्याचा प्रकार आहे असे त्यांनी सांगितले. भाजपचे नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चेष्टा करतील. ते संविधानावर बुलडोजर चालवतील. केंद्रीय मंत्री अमितजी शहा ज्याना आम्ही नेहमी आदराने संबोधतो. ते जर खुद्द या देशाच्या घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द उच्चारून त्यांची चेष्टा करू शकतात तर मग ते राहुल गांधी व खर्गे यांना कसे सोडतील? याच विचारसरणीने महात्मा गांधींची हत्या केली होती.
या विचारसरणीचा महात्मा गांधींनी आपल्या हयातीत विरोध केला होता. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती जो गांधी आहे त्याला ही अग्निपरीक्षा द्यावीच लागते. त्यांना या पद्धतीच्या देशाला तोडणाऱ्या शक्तींचा विरोध सहन करावा लागतो. त्यामुळेच राहुल गांधी हे महात्मा गांधी आहेत अशा शक्तींविरुद्ध महात्मा गांधी झुकले नव्हते राहुल गांधी देखील झुकणार नाहीत, असे रणदीप सुरजेवाला यांनी शेवटी सांगितले.