बेळगाव लाईव्ह :राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली 26 डिसेंबर 1924 रोजी काँग्रेसचे अधिवेशन बेळगावमध्ये झाले. त्याचा शताब्दी उत्सव उद्या गुरुवारी 26 डिसेंबरपासून दोन दिवस साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव लाईव्हच्या प्रतिनिधीने संवाद साधला असता ते बोलत होते.
राजेंद्र कलघटगी 1924 च्या काँग्रेस अधिवेशनाबद्दल माहिती देताना म्हणाले की, सदर अधिवेशन झाले त्यावेळी मी अवघा चार वर्षाचा होतो. मात्र त्यानंतर 15 वर्षांनी मी जेंव्हा जाणता झालो त्यावेळी मुंबईमध्ये महात्मा गांधीजींनी आपण स्वातंत्र्यासाठी आता निर्णायक लढा देणार आहोत असे सांगून अहिंसा मार्गाने दिल्या जाणाऱ्या या लढ्यात सर्वजण ‘जिंकू किंवा मरू’ या निर्धाराने सहभागी व्हा, असे जाहीर आवाहन केले होते. आकाशवाणीवरील बातम्यांमध्ये हे आवाहन माझ्यासह संपगावचे वाली चन्नप्पा, बडसचे व्ही. आर. पाटील, बैलहोंगलचे बिषनकोप, कत्ती, दोदवाड वगैरे आम्ही दहा मित्रांनी ऐकले. आम्हा मित्रांपैकी वाली चन्नप्पा हे खूप धाडसी धडाडीचे असल्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध छोट्या-मोठ्या कारवाया करत होतो. ज्यामध्ये रेल्वे रुळाचे बोल्ट निखळवणे वगैरे गोष्टींचा समावेश असायचा. त्याचाच एक भाग म्हणून देशाच्या स्वातंत्र्यासाठी अहिंसेच्या मार्गाने चळवळ करण्याचा संदेश येणारी वृत्तपत्रे घरोघरी टाकण्याचे आणि लोकांमध्ये स्वातंत्र्यलढ्याबद्दल जागृती निर्माण करण्याचे काम मी स्वतः करत होतो. हे काम दोन वेळा मी यशस्वीरित्या पार पाडले, मात्र तिसऱ्या वेळी पोलिसांनी मला पकडले. त्यानंतर पोलिसांनी मला प्रथम कॅम्प येथील पोलीस ठाण्यात नेले त्यानंतर भुईकोट किल्ल्यामध्ये असलेल्या न्यायालयात हजर केले. न्यायाधीशानी मला तुम्ही अजून लहान मुलं आहात कशाला यामध्ये पडता त्यापेक्षा कामधंदा करा’, असा दम भरला. तेंव्हा ‘स्वातंत्र्य मिळेपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. काहीही झालं तरी चालेल आम्ही लढतच राहणार, असे मी ठामपणे न्यायाधीशांना सांगितले. तेंव्हा न्यायाधीशाने मला 7 महिन्यांची कारावासाची शिक्षा ठोठावून माझी रवानगी हिंडलगा कारागृहात केली.
राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचे विचार आजच्या काळात रुजवणे किती गरजेचे आहे? त्यांचे विचार काय होते? या प्रश्नाला उत्तर देताना राजेंद्र कलघटगी यांनी अहिंसा मार्ग हा गांधीजींचा प्रमुख विचार होता आणि ब्रिटिशांनी भारताची चालवलेली लूट त्यांना पहावत नव्हती असे सांगितले. मी स्वतःला 1943 पासून स्वातंत्र्यलढात झोकून दिले.
त्यावेळी माझ्यासमवेत बडसचे बी. आर. पाटील, बैलहोंगलचे बिषणकोप, दोदवाडचे कत्ती, नाथ पै चौक बेळगाव येथील सिद्धाप्पा होनगेकर असे माझे एकुण दहा मित्र असायचे आणि आम्हा सर्वांचे नेतृत्व वाली चन्नप्पा हे करायचे. रेल्वे रुळाचे बोल्ट काढणे, पोस्टाचा डब्बा पेटवून देणे आदी प्रकार करून आम्ही ब्रिटिश पोलिसांना त्रास द्यायचो. रुळाचे बोल्ट काढताना एक दिवस पोलीस आले तेंव्हा मी रेल्वेवर ब्रिज खाली असलेल्या मोठ्या गटारात दडून बसलो होतो. पुढे मी स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन करणारी वृत्तपत्रे घरोघरी टाकून लोकांमध्ये स्वातंत्र्य लढ्याबद्दल जागृती निर्माण करण्याचे काम केले, अशी माहिती कलघटगी यांनी पुढे दिली.
याप्रसंगी उपस्थित व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते विकास कलघटगी यांनी 1924 च्या अधिवेशनात सहभाग असलेल्या आपल्या आजोबांबद्दल बोलताना सांगितले की, माझे आजोबा वामन सातवप्पा कलघटगी हे त्यावेळच्या बेळगाव व्यापारी संघाचे अध्यक्ष होते. त्याचप्रमाणे बेळगाव पायोनियर बँक आणि बेळगाव डीसीसी बँकेचे संचालक देखील होते. त्यामुळे शहरात विशेष करून बाजारपेठेत त्यांचे मोठे प्रस्थ होते. आमचे दुकान हे 1894 मध्ये बांधण्यात आले आहे. स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग असणाऱ्या माझ्या आजोबांनी झेंडा चौकामध्ये 1905 मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या समवेत तसेच शहरातील याळगी परिवार, धान्याचे व्यापारी पाटणेकर बंधूआदींच्या सहकार्याने बेळगावातील पहिल्या सार्वजनिक गणपतीची प्रतिष्ठापना केली. महात्मा गांधीजी यांच्या अध्यक्षतेखाली 1924 मध्ये काँग्रेसचे अधिवेशन झाले.
त्यावेळी रामदेव गल्लीत आमच्या घराशेजारी कट्टर काँग्रेस समर्थक गंगाधरराव देशपांडे यांचे घर होते त्यांचे आमच्या घरी येणे -जाणे असायचे. तसेच आमच्या घरासमोर असलेल्या नागनूर स्वामीजींच्या मठात काँग्रेसच्या बड्या बड्या नेत्यांची ये -जा असायची. त्यामुळे माझ्या आजोबांचा काँग्रेसशी निकटचा संबंध निर्माण झाला होता. व्यापारी असल्यामुळे अधिवेशनाच्या आयोजनासाठी निधी गोळा करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती.
त्याचप्रमाणे अधिवेशनासाठी येणाऱ्या लोकांची खानपानाची सोय करण्याची जबाबदारी देखील त्यांच्याकडे देण्यात आली होती. त्यामुळे पडद्याआड असले तरी तत्कालीन अधिवेशन यशस्वी करण्यात माझे आजोबा वामन सातवप्पा कलघटगी यांचेही मोठे योगदान होते, असे विकास कलघटगी यांनी शेवटी अभिमानाने सांगितले.