बेळगाव लाईव्ह : राजस्थानचे राज्यसभा सदस्य नीरज डांगी यांची प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना बेळगावमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची प्रकृती जाणून घेतली आणि त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
काँग्रेसच्या कार्यसमितीच्या शताब्दी कार्यक्रमासाठी बेळगावमध्ये आलेले राजस्थानचे राज्यसभा सदस्य नीरज डांगी यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर त्यांना तत्काळ बेळगावमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सध्या तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी रुग्णालयाला भेट देऊन नीरज डांगी यांची प्रकृती जाणून घेतली. त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधत धीर दिला आणि डांगी यांच्या त्वरित आरोग्य सुधारासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
नीरज डांगी काँग्रेस पक्षाचे महत्त्वाचे नेते असून काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी ते बेळगावमध्ये आले होते. मात्र, प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना कार्यक्रमाला हजेरी लावता आली नाही.
त्यांच्या आरोग्याविषयी चिंता व्यक्त करत कर्नाटकातील काँग्रेस नेत्यांनीही त्यांना आरोग्य सुधारणेसाठी शुभेच्छा देत तब्येतीची विचारपूस केली आहे.