बेळगाव लाईव्ह :देशाच्या घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची यांच्या पदावरून ताबडतोब हकालपट्टी करावी, अशी मागणी बेळगावातील वकील आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभिमानी बळग, बेळगाव या संघटनेतर्फे राष्ट्रपतींकडे करण्यात आली आहे.
बेळगाव शहरातील वकील आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभिमानी बळगच्या कार्यकर्त्यांनी आज सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत आंदोलन छेडले. तसेच उपरोक्त मागणीचे निवेदन राष्ट्रपतींकडे धाडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून त्वरेने पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यावेळी बोलताना आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या वकिलांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की गृहमंत्री शाह यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा केलेला अपमान म्हणजे देशातील 120 कोटी जनतेचा अपमान आहे.
हा बाबासाहेबांचा अवमान नव्हे तर प्रत्येक भारतीयाचा अवमान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाचे संविधान निर्माण केल्यामुळेच आपल्याला स्वर्ग लाभला आहे. त्यांनी संविधान लिहिल्यामुळे दलित, मागासवर्गीय, शोषित तसेच समाजातील महिलाची नरकातून मुक्तता झाली आहे.
ज्या संविधानावर हात ठेवून केंद्रीय मंत्री शाह यांनी शपथ घेतली त्या संविधानाचे निर्माते डॉ. आंबेडकर यांचाच त्यांनी अपमान करणे ही अतिशय लाजिरवाणी, अत्यंत खेदजनक बाब आहे, त्यांनी सांगितले.
तसेच गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून त्यांच्या पदाचा तात्काळ राजीनामा घेतला जावा अशी मागणी वकिलांनी केली.