Tuesday, December 17, 2024

/

जाती प्रमाणपत्रासाठी भोवी बांधवांचे सुवर्ण विधानसौध समोर आंदोलन

 belgaum

बेळगाव लाईव्ह :भोवी जातीतील नागरिकांना अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र देताना त्या प्रमाणपत्रावर केवळ भोवी असाच उल्लेख करावा आणि वड्डर असा उल्लेख टाळावा, या मागणीसाठी अखिल कर्नाटक भोवी समाज कल्याण संघातर्फे काल सोमवारी सुवर्ण विधानसौध समोर आंदोलन करण्यात आले.

बेळगावसह उत्तर कर्नाटकातील विजापूर धारवाड बागलकोट या जिल्ह्यांमध्ये भोवी समाज मोठ्या प्रमाणात आहे. अनुसूचित जाती यादीमध्ये भोवी बरोबरच वड्डर उपजातीचा समावेश करण्यात आल्यामुळे भोवी समाजातील पालखी वाहून नेणाऱ्या व्यक्तींना जातीचे प्रमाणपत्र मिळताना अडचणी येत आहेत.

त्यामुळे संबंधित व्यक्तींना जातीचे प्रमाणपत्र देताना वड्डर हा उल्लेख टाळावा. भोवी समाजाचा एक प्रतिनिधी विधानपरिषदेवर घ्यावा, आदी मागण्यासाठी अखिल कर्नाटक भोवी समाज कल्याण संघातर्फे सुवर्ण विधानसौध नजीकच्या कोंडसकोप आंदोलन स्थळी काल सोमवारी धरणे आंदोलन छेडण्यात आले.

कर्नाटक सरकारने भोवी समाजासाठी महामंडळ स्थापन केले असले तरी आता या महामंडळाचे भोवी -वड्डर असे नामकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्य सरकारने हे नामकरण तात्काळ थांबवावे आणि महामंडळाचे भूमी महामंडळ असेच नामकरण करावे, अशी मागणी आंदोलकांनी केली.

आपल्या मागण्या संदर्भात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना नाशिक -पुणे येथील भोई समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष नरेश उखंडे यांनी समाजाच्या न्याय हक्कासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत असे सांगितले. कर्नाटक राज्यात आमच्या भोवी समाजाचे जवळपास 10 लाख लोक आहेत. आमचा भोवी समाज हा एकेकाळी देशभरातील राजा -महाराजांच्या पालख्या उचलण्याचे काम करत होता. आता तो काळ गेला असला तरी भोवी समाजाचे लोक आज सर्व क्षेत्रात आहेत.

कर्नाटकसह महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, दिल्ली, हिमाचल प्रदेश वगैरे देशाच्या जवळपास सर्व राज्यांमध्ये आमच्या समाजाचे लोक आहेत. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1956 मध्ये सहा जातींना मागासवर्गीयाचा दर्जा दिला. त्यामध्ये भोवी समाजाचा देखील समावेश होता. त्यानुसार आम्हाला जातीचे प्रमाणपत्र मिळत होते. मात्र आता वड्डर समाजाच्या लोकांना भोवी -वड्डर म्हणून जातीचे प्रमाणपत्र दिले जात आहे आणि तसेच प्रमाणपत्र आम्हालाही दिले जात आहे. जाब विचारल्यास अधिकारीवर्ग तुम्ही वड्डर जातीतच मोडता असे सांगतात. हा आमच्यावर अन्याय असून आम्हाला पूर्वीप्रमाणेच फक्त भोवी असा उल्लेख असलेले जातीचे प्रमाणपत्र दिले जावे.

कारण बापाचे आणि जातीचे नांव कधीही बदलत नाही हे लक्षात ठेवले पाहिजे. राजा -महाराजांची पालखी उचलणारा हे आमच्या समाजाचे चिन्ह आहे. वड्डर समाजाला मागास जातीचे प्रमाणपत्र देण्याबद्दल आमचा कोणताच आक्षेप नाही, मात्र आम्हाला फक्त ‘भोवी’ असा उल्लेख असलेले जातीचे प्रमाणपत्र दिले जावे अशी आमची मागणी आहे. आमच्या या मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तशा आशयाचे परिपत्रक तात्काळ संबंधित खात्यांना जारी करावे. अन्यथा आज फक्त कांही हजार लोक आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत जर आमची मागणी मान्य झाली नाही तर राज्यातील 10 लाख भोवी बांधव रस्त्यावर उतरतील. बेंगलोर येथील विधानसौधला घेराव घातला जाईल, असा इशारा नरेश यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.