बेळगाव लाईव्ह : विजयपुरचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी विश्वगुरू बसवण्णांविरोधात केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ लिंगायत समाजाने शनिवारी बेळगावमध्ये भव्य आंदोलन छेडले. यावेळी आम. यत्नाळ यांचे छायाचित्र दहन करून संताप व्यक्त करण्यात आला.
विश्वगुरू बसवण्णांचे तत्वज्ञान आणि संस्कृती जगभर मान्य आहे. मात्र, यत्नाळ यांनी त्यांच्या विरोधात अपमानकारक विधाने केली आहेत. यत्नाळ यांनी असे वक्तव्य करून लिंगायत समाजाचा अपमान केला आहे.
त्यांनी तातडीने माफी मागावी, अन्यथा आम्हाला उग्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा आंदोलकांनी दिला. यावेळी आम. यत्नाळ यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि अधिवेशनातून त्यांना बाहेर काढावे, अशी मागणीही आंदोलकांनी केली.
बेळगावमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आम. यत्नाळ हेदेखील बेळगावमध्ये येणार आहेत. मात्र त्यांच्या विरोधात लिंगायत समाज संतप्त झाला असून यत्नाळ यांना बेळगावमध्ये येण्याचे आव्हान देण्यात आले आहे.
यावेळी लिंगायत समाजाच्या विविध संघटना, लिंगायत समाजाचे नेते, संघटनांचे पदाधिकारी आणि शेकडो लिंगायत समाजबांधव सहभागी झाले होते.