बेळगाव लाईव्ह: महात्मा गांधींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अधिवेशनाला १०० वर्षे पूर्ण होत असून बेळगावमध्ये याचा शतक महोत्सव आयोजिण्यात आला आहे. हा कार्यक्रम ऐतिहासिक ठरेल, असा विश्वास एआयसीसी राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी व्यक्त केला.
बेळगाव येथे कर्नाटक काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावळी काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला, अजय माकन, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री शिवकुमार, सतीश जारकीहोळी आदी उपस्थित होते.
महात्मा गांधींचे सिद्धांत प्रत्येक काँग्रेस नेत्याने आत्मसात करणे गरजेचे आहे असे सांगत भाजपवर त्यांनी टीकाही केली. ज्या अहिंसेच्या मार्गावर महात्मा गांधींनी स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला, त्या महात्मा गांधींच्या तत्वांना आज भाजप पायदळी तुडवत आहे. भाजपच्या विचित्र धोरणांमुळे देशातील गरीब आणि श्रीमंत यातील दरी वाढत आहे. श्रीमंत अधिक श्रीमंत आणि गरीब अधिक गरीब होत आहेत. देशात समानता उरली नाही. जातीपातीचे राजकारण करून जातीव्यवस्था गढूळ करण्यात येत आहे. अहिंसेच्या मार्गाने महात्मा गांधीजींनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला, समानतेवर भर दिला परंतु आजची देशाची परिस्थिती वेगळी आहे. भाजपने हि सारी तत्वे पायदळी तुडविली. धर्माच्या नावाचे राजकारण करून जनतेमध्ये दरी वाढविण्याचे काम भाजपने केले आहे. लोकशाहीवर भाजपचा विश्वास नाही, अशी टीकाही रणदीप सुरजेवाला यांनी यावेळी केली.
गांधी भारत कार्यक्रमाच्या तयारीसाठी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अन्य अनेक प्रमुख नेते सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली असून, विविध विभागांनी या कार्यक्रमासाठी आवश्यक तयारी सुरू केली आहे. याशिवाय, गांधी भारत कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुढील वर्षभर विविध उपक्रम आयोजित केले जाणार असून, महात्मा गांधी यांच्या पुतळ्यांचे स्थापन तसेच विविध जनजागृती उपक्रमात सहभाग नोंदवला जाईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.तत्पूर्वी काँग्रेस नेत्यांनी बेळगाव येथे होणाऱ्या शतकपूर्ती सोहळ्याचा आढावा घेतला.
उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार म्हणाले, बेळगावच्या गांधी भारत कार्यक्रमासाठी प्रचंड उत्साह आहे आणि काँग्रेसने यासाठी जय्यत तयारी केली आहे, महात्मा गांधी यांच्या विचारांना अनुसरून कार्यक्रम यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला असून महात्मा गांधींच्या अध्यक्षतेखाली १९२४ मध्ये झालेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर २६ आणि २७ डिसेंबर रोजी काँग्रेस पक्ष आणि सरकारतर्फे गांधी भारत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे