बेळगाव लाईव्ह : हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावमध्ये सुवर्ण विधानसौधसमोर पंचमसाली समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु केलेल्या आंदोलनाला गालबोट लागले असून घेराव घालण्याच्या प्रयत्नातील आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला आहे. या आंदोलनात काही नेत्यांनाही अटक करण्यात आली आहे.
पंचमसाली समाजाला २ए श्रेणीतील आरक्षण मिळावे यासाठी कुडलसंगम पिठाचे बसवजय मृत्युंजय स्वामी यांच्या नेतृत्वाखाली समाजातील अनेक नेत्यांनी हजारोंच्या उपस्थितीत आज सुवर्ण सौध परिसरात भव्य आंदोलन छेडण्यात आले.
कोंडुसकोप्पहुन सुवर्णसौध ला घेराव घालण्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी आगेकूच करताच पोलिसांनी लाठीचार्ज सुरु केला. यावेळी आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा देखील प्रयत्न केला. जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करणाऱ्या आंदोलकांवर अखेर पोलिसांनी लाठीचार्ज सुरु केला.
यावेळी पोलीस आयुक्त याडा मार्टिन देखील यावेळी स्वतः हजर होते. सुमारे दहा हजार हुन अधिक आंदोलक यावेळी उपस्थित होते. पोलिसांनी केलेला या लाठी हल्ल्यात अनेक जण जखमी झालेले आहेत.
या आंदोलनातील कुडलसंगम पिठाचे बसवजय मृत्युंजय स्वामी यांच्यासह विजयपूरचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, आम. अरविंद बेल्लद आदींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
महाराष्ट्रात मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला होता आणि सरकार पुढे तो पेच निर्माण झाला होता. आता कर्नाटकात देखील त्याच पद्धतीने पंचम साली लिंगायत समाज आरक्षणासाठी आक्रमक होऊ लागलेला आहे.