बेळगाव लाईव्ह :देशातील समस्त शोषित समुदायाच्यावतीने बेळगाव जिल्ह्यासह राज्यातील सर्व अनुसूचित जाती जमाती, मागासवर्गीय आणि अल्पसंख्यांक बांधवांनी कर्नाटक राज्य मागास जाती संघटना आणि कर्नाटक शोषित समुदाय महासंघटना बेंगलोर यांच्या नेतृत्वाखाली आपल्या विविध मागण्यांसाठी आज बुधवारी बेळगाव सुवर्ण विधानसौध समोर आंदोलन छेडले.
कर्नाटक राज्य मागास जाती संघटना आणि कर्नाटक शोषित समुदाय महासंघटना बेंगलोर यांच्या नेतृत्वाखाली आज करण्यात आलेल्या या धरणे सत्याग्रहमध्ये बेळगाव जिल्ह्यासह राज्यातील मागास व अल्पसंख्यांक बांधव बहुसंख्येने सहभागी झाले होते.
सदर आंदोलनाची दखल घेत कर्नाटक सरकारचे प्रतिनिधी या नात्याने मंत्री महादेवाप्पा यांनी आंदोलन स्थळी भेट दिली. तसेच आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या नेते मंडळींशी चर्चा करून त्यांनी सादर केलेल्या विविध मागण्यांचे निवेदन स्वीकारले. तसेच निवेदनातील मागण्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन मंत्री महादेवप्पा यांनी दिले.
आंदोलन स्थळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना बुडाचे अर्थात बेळगाव शहर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष मनोहर चिंगळे म्हणाले की, देशातील समस्त शोषित समुदायाच्यावतीने त्यांच्या विविध मागण्या राज्य सरकार समोर मांडण्यासाठी आज आम्ही बेळगाव जिल्ह्यातील सर्व अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीय आणि अल्पसंख्यांक कर्नाटक राज्य इतर मागासवर्गीय (ओबीसी) महासंघाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी एकत्र आलो आहोत.
आमच्या मागण्यांपैकी पहिली मागणी ही आहे की कांत राज आणि जे प्रकाश अहवालाची अंमलबजावणी केली जावी हा अहवाल असे सांगतो की राज्यात किती मागासवर्गीय आहेत त्यांची शैक्षणिक पात्रता काय आहे त्यांची आर्थिक व सामाजिक स्थिती काय आहे हे लक्षात घेऊन सरकारने त्यांना आवश्यक सहकार्य करावे मात्र सरकारला सुशिक्षित समाज नेमका कुठे आहे याचीच माहिती नसेल तर त्यांना मदत करणे शक्य होणार नाही हे लक्षात घेऊन कांत राज अहवाल जाहीर चर्चेसाठी जारी करावा आणि सर्वसमावेशक चर्चे अगदी त्यात काही त्रुटी असतील तर त्या दुरुस्त करून तो तात्काळ अंमलात आणला जावा. याव्यतिरिक्त 2-अ श्रेणीमध्ये लिंगायत, मराठा वगैरे जातींमधील बऱ्याच उपजातींचा समावेश आहे.
मराठा सुतार, मराठा न्हावी, मराठा माळी यांच्यासह लिंगायत व धनगर समाजातील जाती या आधीपासून शोषित आहेत. या जातींच्या उत्कर्षासाठी सरकारने पाऊल उचलले पाहिजे. सध्याचे सरकार व्यवस्थित चालले आहे त्यामुळे आपण सर्वांनी लोकशाही मार्गाने शांततेने आपल्या मागण्या सरकार समोर मांडल्या पाहिजेत तथापि काही विघ्नसंतोषी मंडळी याला तडा देण्याचा प्रयत्न करत आहेत. जातीवादी लोकांकडून अशांतता, द्वेष पसरवण्याचे काम केले जात आहे. कोणत्याही शोषित समाजाबद्दल पक्षीय राजकारण होता कामा नये, असे सांगून लोकशाहीच्या मार्गाने शांततेत मांडलेल्या मागण्यांचा सरकार निश्चितपणे विचार करेल, असे चिंगळे यांनी शेवटी स्पष्ट केले.