बेळगाव लाईव्ह विशेष : अलीकडे यात्रा, जत्रा, सण, समारंभ अशा अनेक कार्याचे मूळ स्वरूप आणि उद्देश बाजूला हटत चालला असून केवळ भंपकबाजी आणि दिखाऊपणा करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये केवळ बहुजन समाज आर्थिक, शैक्षणिक, समाजी आणि सर्वचदृष्टीने भरडला जात असल्याचे दिसून येत असून गेल्या काही वर्षात बहुजन समाजातील अनेक समाजसुधारक नेत्यांनी याबाबत जनजागृतीचे कार्य हाती घेतले आहे. तालुक्याच्या उत्तरेला असणाऱ्या कंग्राळी खुर्द गावानेही यंदाच्या वार्षिक यात्रोत्सवात असाच आदर्श आणि अनुकरणीय निर्णय घेत येथील श्री मसणाई देवी यात्रा परंपरेनुसार आणि डॉल्बीमुक्त साजरी करून प्रत्येक गावांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
यासंदर्भात ग्राम पंचायतीचे माजी अध्यक्ष यल्लाप्पा पाटील यांनी ‘बेळगाव लाईव्ह’ शी बोलताना सांगितले, गेल्या २ वर्षात गावातील वार्षिक यात्रोत्सवाचे स्वरूप बदलले होते. यामुळे गावातील सामाजिक वातावरणावर चुकीचा परिणाम जाणवत होता. हि बाब लक्षात घेत नवजागृती संघटनेच्या माध्यमातून गावातील ज्येष्ठ नागरिक आणि महिला मंडळांच्या सहकार्याने गावाच्या वार्षिक यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती करण्यात आली. यंदाची यात्रा डॉल्बीमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला.
यानुसार यंदाची यात्रा अत्यंत भक्तिपूर्ण वातावरणात, शांततेत आणि परंपरेला साजेशी साजरी झाली. यासाठी गावातील तरुण वर्गाचेही मोलाचे सहकार्य लाभले. तालुका असो वा जिल्हा आपला मराठा समाज चुकीच्या प्रथांमुळे भरडला जात आहे. वास्तविक पाहता परंपरेनुसार सण, उत्सव, समारंभ साजरे करण्याची गरज आहे. कंग्राळी खुर्द गावाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी बेळगावमधील सर्वच भागातील नागरिकांनी आपापल्या भागात करून कंग्राळी खुर्द गावचा आदर्श घ्यावा, डॉल्बीला, अनावश्यक खर्चाला फाटा देत सण, उत्सव, समारंभ परंपरेनुसार साजरे करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
याचप्रमाणे माजी ग्रामपंचायत अध्यक्षा रुक्मिणी परशराम निलजकर बोलताना म्हणाल्या, पूर्वी यात्रा – उत्सवाचे स्वरूप छोट्या प्रमाणात होते. मात्र अलीकडे यात्रेचे स्वरूप पालटले आहे. डॉल्बीची चुकीची प्रथा सुरु करण्यात आली. यामुळे गावकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत होती. यामुळे गावातील महिलांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी, पंच मंडळींनी पुढाकार घेऊन डॉल्बीला आळा घालण्याचा निर्णय घेतला.
अशा चुकीच्या प्रथांमुळे समाज आणि संस्कृती भरकटत चालली आहे. प्रामुख्याने तरुण पिढी भरकटत जात आहे. आपल्या समाजातील तरुण वर्गाने उच्चशिक्षण घ्यावे. देशाचे नाव उज्वल करावे हि आजची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. कांरगळी खुर्द गावाने राबविलेला डॉल्बी मुक्त उपक्रम इतर गावांनाही राबवावा, असे आवाहन त्यांनी केले.
शाम सदलगेकर बोलताना म्हणाले, नवजागृती संघाच्या वतीने समाजात सुरु असलेल्या कुप्रथांना आळा घालण्याचा निर्णय घेण्यात आळा असून केवळ सण, उत्सव, यात्राच नाही तर विवाहसमारंभात देखील होणारा अनावश्यक खर्च, चुकीच्या चालीरीती आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे मुहूर्तावर अक्षतारोपण होणे गरजेचे आहे. ज्यापद्धतीने कंग्राळी गावातील यात्रा डॉल्बीमुक्त करण्याचा निर्णय घेऊन तो यशस्वी करण्यात आला त्याचप्रमाणे पुढील टप्प्यात विवाह समारंभ देखील डॉल्बीमुक्त आणि वेळेवर अक्षतारोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कंग्राळी खुर्द गावाने घेतलेला निर्णय अत्यंत योग्य असून अशाचपद्धतीने प्रत्येक गावोगावी परंपरेला अनुसरून, अनावश्यक खर्चाला फाटा देत सण, उत्सव, समारंभ साजरे करण्याची गरज आहे. कंग्राळी खुर्द गावाने घेतलेल्या निर्णयाचा प्रत्येक गावाने आदर्श घेणे गरजेचे आहे.