बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधानपरिषद सदस्य आणि भाजप नेते सी टी रवी यांनी महिला आणि बालकल्याण विभाग मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याविरोधात आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला. त्यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस आणि भाजप यांच्यात तणाव निर्माण झाला असून, त्यानंतर विधानसभेत गंभीर वाद निर्माण झाला. विवादाची गंभीरता वाढली आणि मंत्री हेब्बाळकर समर्थकांनी विधानसभेच्या परिसरात जमून निदर्शने सुरु केली.
सी. टी. रवी यांनी लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याविरोधात असभ्य आणि अपमानास्पद शब्दांचा वापर केल्याने, त्यांचे अनेक समर्थक विरोध प्रदर्शनासाठी रस्त्यावर उतरले. त्यांच्या समर्थनार्थ सुवर्णसौधच्या परिसरात भाजप व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये ताण-तणाव निर्माण झाला. सी. टी. रवी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या अटकेची मागणी हेब्बाळकर समर्थकांनी केली.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना सी. टी. रवी यांनी लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याविरोधात केलेला शब्द फौजदारी गुन्हा मानला जातो, असे स्पष्ट केले.
त्यांनी सी. टी. रवी यांच्याविरुद्ध तातडीने पोलिसांत तसेच सभापतींकडे तक्रार दाखल केली असून, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सी. टी. रवी यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला.
घडलेल्या प्रकारानंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना सी. टी. रवी यांनी बचावात्मक वक्तव्य केले. “मी कुणालाही अपशब्द वापरला नाही, गरज पडल्यास कामकाजादरम्यानचे सर्व ऑडिओ आणि व्हिडीओ पडताळून पाहू शकता, मी घाबरणारा राजकारणी नाही आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी कधीही वादाला जाणार नाही, माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेला.” असे त्यांनी सांगितले. यादरम्यान सुवर्णसौधच्या पहिल्या मजल्याबाहेर सी. टी. रवी यांनी धरणे धरले. यावेळी भाजप नेत्यांनी पोलिसांवर टीका केल्या. विधानसभा परिसरात गुंड घुसल्याच्या आरोप भाजप नेत्यांनी केला. ओळखपत्राविना हे लोक आत कसे शिरले? असा प्रश्न उपस्थित करत सभापतींकडे याबाबत तक्रार करण्यात येणार असल्याचे सी. टी. रवी. म्हणाले.
काँग्रेस कार्यकर्ते, नेते आणि हेब्बाळकर समर्थकांच्या गोंधळानंतर हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात सी. टी. रवी यांच्या विरोधात भादंवि संहितेच्या कलमान्वये कायदा क्रमांक ७५ आणि ७९ अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे कर्नाटक राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.