बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये काँग्रेस पक्षाने अधिवेशन शतकपूर्ती कार्यक्रमाचे आयोजन केले असून, या कार्यक्रमात काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकांसह राहुल गांधी, सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांची जाहीर सभा होणार आहे. अधिवेशन शतकपूर्तीनिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार असून २६ आणि २७ डिसेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु असल्याची माहिती उत्तर मतदार संघाचे आमदार असिफ सेठ यांनी ‘बेळगाव लाईव्ह’ शी बोलताना दिली.
यावेळी ते म्हणाले, काँग्रेसच्या शतकपूर्ती सोहळ्याची सुरुवात 26 आणि 27 डिसेंबर रोजी बेळगावमध्ये होणार आहे. या दोन दिवसीय कार्यक्रमात काँग्रेस कार्यकारी समितीची बैठक आणि जाहीर सभा आयोजित केली जात आहे. 26 डिसेंबर रोजी काँग्रेस कार्यकारी समितीची बैठक होणार असून, त्यात काँग्रेसचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी बेळगावात उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत आगामी राजकीय परिस्थिती, काँग्रेसच्या धोरणे आणि आगामी निवडणुका यावर चर्चा होईल. बैठकेत खासदार, राज्यसभा सदस्य आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य सहभागी होणार आहेत.
27 डिसेंबर रोजी राहुल गांधी, सोनिया गांधी आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची जाहीर सभा आयोजित केली आहे. या सभेत काँग्रेस पक्षाच्या आगामी योजनांबद्दल चर्चा होईल आणि उत्तर कर्नाटकाशी संबंधित विषयांवर विशेष लक्ष दिले जाईल. उत्तर कर्नाटकाच्या विकासाच्या दृष्टीने काँग्रेसने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत, जे या सभेत अधिक स्पष्ट होतील.
काँग्रेस पक्षाचे आमदार असिफ सेठ यांनी सांगितले की, शतकपूर्ती कार्यक्रम पूर्ण वर्षभर चालणार असून, त्याचे आयोजन विविध ठिकाणी करण्यात येईल. रामतीर्थ नगर मध्ये कर्नाटक केसरी गंगाधरराव देशपांडे यांच्या स्मारकाचे उद्घाटन आणि त्यासोबतच एक फोटो प्रदर्शन आयोजित केले जाईल. यासोबतच हुदली येथील गांधी भवान, पिरनवाडी येथील गांधी स्मारक आणि वीर सौधाच्या विकासकामांची सुरुवात केली जाईल. या सर्व कार्यक्रमांचे आयोजन काँग्रेस पार्टीने तामझाम करून सुरू केले आहे, जे काँग्रेसच्या ऐतिहासिक वारशाला उजाळा देईल. काँग्रेसच्या 100 वर्षांपूर्वीच्या सोहळ्यांची आठवण जागवण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. 100 वर्षांपूर्वी काँग्रेसने बेळगावमध्ये विविध ऐतिहासिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते, त्याच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या शतकपूर्तीच्या कार्यक्रमांची रचना केली आहे.
बेळगावमधील हिवाळी अधिवेशनासंदर्भात बोलताना ते म्हणाले, अधिवेशनात उत्तर कर्नाटकाशी संबंधित विकासावर चर्चा होणार आहे. उत्तर कर्नाटकात विकसित होणाऱ्या पायाभूत सुविधा, रोजगार निर्माण आणि इतर विकासात्मक योजना यावर या चर्चेत चर्चा होईल. यासाठी दोन दिवसांचा वेळ राखीव ठेवण्यात आला आहे, ज्यामुळे उत्तर कर्नाटकाशी संबंधित मुद्दे व विचार अधिक स्पष्ट होईल. या अधिवेशनात विशेषत: काँग्रेसच्या दृष्टिकोनातून उत्तर कर्नाटकाचे सामाजिक आणि आर्थिक प्रश्न समोर आणले जातील.
आमदार असिफ सेठ यांच्या मंत्रिपदाबाबत सुरु असलेल्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, सर्वांनी आपल्या इच्छेनुसार मंत्रीपदाची मागणी केली आहे, आणि त्यासाठी मी देखील सतीश जारकीहोळी यांच्या मार्गदर्शनाखाली मागणी केली आहे. तथापि, मंत्रीपद देणे हे सतीश जारकीहोळी आणि काँग्रेसच्या हाय कमांडवर अवलंबून आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.