बेळगाव लाईव्ह :भाषावार प्रांत रचने वेळी अन्यायाने कर्नाटकात डांबली गेलेली बेळगावसह 865 मराठी भाषिक गाव महाराष्ट्रात सामील केली जावी. यासाठी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेला सीमावाद निकालात काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने संपूर्ण ताकद लावावी याकरिता महाराष्ट्र एकीकरण समितीने ‘चलो नागपूर’ ही धडक मोहीम हाती घेतली असून ही मोहीम यशस्वी करण्यासाठी समितीचे नेते व कार्यकर्ते असे सुमारे 60 जण आज सोमवारी नागपूरच्या दिशेने रवाना झाले.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात महाराष्ट्र एकीकरण समितीचे धडाडीचे नेते रमाकांत कोंडुसकर यांच्या हस्ते आज नागपूरच्या दिशेने प्रवासाला निघणाऱ्या बसचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी समितीचे नेते माजी नगरसेवक रणजीत चव्हाण -पाटील, सागर पाटील आदींसह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते आणि मराठी भाषिक बहुसंख्येने उपस्थित होते याप्रसंगी बेळगाव लाईव्हशी बोलताना रमाकांत कोंडुसकर म्हणाले की, गेली 68 वर्षे भीजत पडलेला सीमाप्रश्न त्वरेने निकालात निघावा आणि त्यासाठी महाराष्ट्रातील पुढाकार घ्यावा यासाठी आम्ही सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते नागपूर येथे महाराष्ट्र सरकारचे जे अधिवेशन सुरू आहे त्या ठिकाणी जाऊन आवाज उठवणार आहोत. अधिवेशनाला उपस्थित महाराष्ट्रातील समस्त 288 आमदारांना आम्ही भेटणार आहोत. या भेटीचा उद्देश सीमा प्रश्नाची सोडवणूक हा तर असणाराच आहे, मात्र त्याखेरीज बेळगाव शहरासह सीमाभागातील मराठी भाषिकांसाठी निर्माण होत असलेली सध्याची प्रतिकूल परिस्थिती, वातावरण महाराष्ट्रातील नेते मंडळींच्या कानावर घालणे हा असणार आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या खटल्याचा निकाल महाराष्ट्राच्या बाजूने लागावा यासाठी महाराष्ट्र सरकारने ठोस पावले उचलावीत.
त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील नव्या सरकारने मागील सरकारने नियुक्त केल्याप्रमाणे सीमा भागासाठी तीन समन्वयक मंत्र्यांची नियुक्ती करून सीमाप्रश्नाचा ताबडतोब सोक्षमोक्ष लावावा. सीमा भागातील 865 मराठी भाषिक गावांवर जो अन्याय होत आहे त्याला वाच्या फोडण्यासाठी आम्ही नागपूरला जात आहोत असे सांगून त्याचप्रमाणे बेळगावमध्ये विकासाच्या नावाखाली 1800 एकर शेत जमिनीचे भूसंपादन करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा प्रकार सुरू आहे. ही बाब देखील आम्ही महाराष्ट्रातील नेते मंडळींच्या निदर्शनास आणून देणार आहोत प्रामुख्याने मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री आणि समस्त मंत्रिमंडळासमोर आम्ही उपरोक्त बाबी मांडणार आहोत, असे कोंडुसकर यांनी स्पष्ट केले.
समिती नेते माजी नगरसेवक रणजीत चव्हाण -पाटील आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की, विधानसभेच्या निवडणुका होऊन महाराष्ट्रात युतीचे नवे सरकार अस्तित्वात आले आहे यापूर्वी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही सीमा प्रश्नाची सोडवणूक आणि बेळगाव सीमा भागातील मराठी भाषिकांवर होणारा अन्याय दूर व्हावा यासाठी प्रयत्न केले होते.
आता महाराष्ट्रात पुन्हा युतीचे सरकार आले आहे त्या ठिकाणी सरकार कोणतेही येऊ दे त्यांच्यासमोर आपली व्यथा मांडणे हा सीमावासीय मराठी भाषिकांचा अधिकार आहे त्या अनुषंगाने आम्ही महाराष्ट्रातील नव्याने स्थापन झालेल्या मंत्रिमंडळातील मुख्यमंत्र्यांसह प्रत्येकाची भेट घेणार आहोत. आमची ही मोहीम यशस्वी करण्यासाठी चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांचे सहकार्य लाभत आहे. त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांचे भेट घडवून देण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. सध्या सीमा भागातील मराठी भाषिकांची अवस्था “आई खाऊ घालेना आणि बाप भीक मागू देईना” अशी झाली आहे.
प्रत्येक वेळी महाराष्ट्रातील नेते आम्ही सीमावासियांच्या मराठी भाषिकांच्या पाठीशी आहोत असे म्हणत असतात, ते नेमके कसे आमच्या पाठीशी असतात हे जाणून घेण्यासाठी आम्ही यावेळी नागपूरला जात आहोत. गेली दीड दोन वर्षे झाली सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या सीमा प्रश्नाच्या दाव्याचा महाराष्ट्र सरकारकडून आवश्यक तसा पाठपुरावा केला जात नाही. दावा लढवणाऱ्या वकिलांची फी महाराष्ट्र सरकारने अदा केलेली नाही. अशी जर परिस्थिती असेल तर सीमाप्रश्न कसा सुटणार आणि महाराष्ट्रात सामील होण्याची बेळगाव सह सीमा भागातील मराठी भाषिकांचे स्वप्न केव्हा प्रत्यक्षात उतरणार याचा जाब विचारण्यासाठी माझ्यासह रमाकांत कोंडुस्कर सागर पाटील वगैरे आम्ही सर्वांनी नागपूर चलो ही मोहीम हाती घेतली आहे अपयश आले तरी सीमा प्रश्नाची सोडवणूक होईपर्यंत विश्रांती घ्यायची नाही कोठेही थांबायचं नाही असा आमचा निर्धार आहे सीमाप्रश्न सुटेपर्यंत महाराष्ट्र सरकारकडे आम्ही पाठपुरावा करत राहणार आहोत.