बेळगाव लाईव्ह :उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कोल्हापूर येथील शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांनी शिनोली येथे महाराष्ट्रातील सीमा भागातील मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याला बेळगावच्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची मान्यता आणि संपूर्ण पाठिंबा असल्याचे समितीचे सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर आणि खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी स्पष्ट केले आहे.
कोल्हापूर जिल्हा शिवसेनेचे (उ.बा.ठा.) नेते विजय देवणे यांनी एका पत्राद्वारे शिवसेनेतर्फे बेळगाव सीमेवर महाराष्ट्र हद्दीत मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. या संदर्भात अष्टेकर आणि मरगाळे यांनी उपरोक्त प्रतिक्रिया व्यक्त केली. मध्यवर्ती म. ए. समितीचे सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर म्हणाले की, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कोल्हापूर येथील शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्त्यांनी सीमावासीय मराठी बांधवांसाठी लवकरात लवकर एका मेळाव्याचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला असून या मेळाव्याच्या आयोजनाचे निमंत्रण त्यांनी मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीला दिले आहे.
त्यांच्या या निमंत्रण पत्रावरून महाराष्ट्रातील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना सीमावासियांसाठी हिरिरीने काम करत आहे हे स्पष्ट होते आणि यासाठी त्यांना शतशः धन्यवाद. मराठी भाषिकांचा महामेळावा पुन्हा आयोजित करण्याचा निर्णय त्यांनी घेतला याचे आम्ही स्वागत करतो. कारण गेल्या 9 डिसेंबर रोजी कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आयोजित मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला उपस्थित राहण्याची शिवसेना नेते व कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली होती. मात्र त्यांना बेळगाव हद्दीत प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली.
त्या विरोधात त्यांनी जोरदार आवाज उठवून कर्नाटक व महाराष्ट्र सरकारला आपली ताकद दाखवून दिली. सीमावासीय मराठी बांधवांच्या बाबतीत कोणत्याही परिस्थितीत ठाकरे यांची शिवसेना गप्प बसणार नाही हे दाखवून देताना कोल्हापूर शिवसेनेने पुन्हा महामेळाव्याचे आयोजन केले जावे अशी इच्छा प्रकट करण्याद्वारे आपण सीमावासीय मराठी भाषिकांच्या पाठीशी आहोत हे दाखवून दिले आहे. महामेळाव्याचे आयोजनासाठी त्यांनी मध्यवर्ती महाराष्ट्रकीकरण समितीकडे परवानगी मागितली आहे, खरं तर आमच्या परवानगीची काहीच गरज नाही. कारण अशा मेळाव्यांमध्ये बहुसंख्येने सहभागी होणे हे सीमा भागातील मराठी भाषिकांचे कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य म. ए. समितीचे नेते आणि कार्यकर्ते आजतागायत निभावत आले आहेत.
बेळगावमध्ये ज्या ज्या वेळी मिळावी अथवा सभा होतात त्यावेळी आम्ही महाराष्ट्रातील एका विशिष्ट पक्षाच्या नेत्यांना कधीही बोलवत नाही. प्रत्येक वेळी आम्ही महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते, मंत्री, आमदार, खासदार यांना निमंत्रण देत असतो. त्यापैकी जे कोण येतील त्यांच्या समवेत आम्ही मेळावा आयोजित करत असतो. एखाद्या वेळेस महाराष्ट्रातील नेते आले नाही तर मराठी भाषिकांनी स्वबळावर आपले मेळावे यशस्वी केले आहेत. तेंव्हा आता विजय देवणे, संजय पवार आणि समस्त शिवसैनिक शिनोळी येथे जो मराठी भाषिकांचा महामेळावा भरवणार आहेत. त्या मेळाव्याला विरोध करण्याचे काहीच कारण नाही.
या मेळाव्यामध्ये बेळगावसह सीमा भागातील मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे अशी मी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे नम्र विनंती करतो. त्याचप्रमाणे सदर महामेळावा यशस्वी करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन आम्ही विजय देवणे यांना दिले आहे. त्यांनी कोठेही सीमा भागातील मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित करावा त्याला आम्ही संपूर्ण पाठिंबा व्यक्त करून मिळावा यशस्वी करू अशी ग्वाही समितीचे सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर यांनी दिली.
समितीचे खजिनदार प्रकाश मरगळे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, कोल्हापूर येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे प्रमुख विजय देवणे यांनी मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीकडे पत्र पाठवून शिवसेनेतर्फे मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. तेंव्हा महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस पक्ष किंवा इतर कोणीही आम्हा सीमावासियांसाठी मेळावा भरवू देत त्या मेळाव्याला हजेरी लावणे आमचे कर्तव्य आहे.
आम्हाला महाराष्ट्रातील सर्व पक्षांची गरज आहे. सीमाप्रश्न सुटेपर्यंत त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावणे ही महाराष्ट्र एकीकरण समितीची जबाबदारी आहे. त्यामुळे शिवसेनेतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या मेळाव्यास आम्हाला निमंत्रित करण्यात आले तर आम्ही सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्या मेळाव्यास हजेरी लावू यात कोणतेही दुमत नाही. कारण कोल्हापूर शिवसेना वेळोवेळी सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे.
यासाठीच महाराष्ट्रातील विविध पक्ष पक्षाच्यावतीने असो किंवा वैयक्तिक असो एखाद्या कार्यक्रमाला निमंत्रण देतील, तेंव्हा त्या कार्यक्रमांना समितीचे नेते कार्यकर्ते आणि मराठी भाषिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहिले पाहिजे. कोल्हापूर शिवसेनेतर्फे महामेळाव्याचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी स्थळ अद्याप निश्चित झालेले नाही मात्र ज्या ठिकाणी हा मेळावा होईल त्या ठिकाणी जाणे हे आमचे कर्तव्य असणार आहे, असे प्रकाश मरगाळे यांनी स्पष्ट केले.