बेळगाव लाईव्ह : 9 डिसेंबर रोजी बेळगावात होणाऱ्या कर्नाटक विधिमंडळाच्या अधिवेशनाविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या महामेळाव्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने धास्ती घेत मराठी भाषिकांनी आयोजित केलेल्या संभाव्य ठिकाणी जमावबंदीचा आदेश लागू करत महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगाव प्रवेश बंदी करण्याचा आदेश देखील बजावला आहे.
बेळगाव येथील हिवाळी अधिवेशनाविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळाव्यासाठी पाच ठिकाणी जाहीर केली होती. पाच वेगवेगळ्या ठिकाणी निदर्शने केली जाणार होती त्याची जास्ती घेत पोलीस आयुक्त मार्टिन यांनी त्या पाचवी ठिकाणी जमावबंदीचा आदेश लागू केला आहे.
बेळगाव शहरातील वॅक्सिंन डेपो , लेले मैदान, धर्मवीर संभाजी चौक, धर्मवीर संभाजी उद्यान, छत्रपती शिवाजी उद्यान परिसरात जमावबंदीचा आदेश असणार आहे. सोमवारी सकाळी 6 वाजता ते रात्री 12 वाजे पर्यंत जमाव बंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. या जमावबंदीच्या आदेशानंतर 5 पेक्षा अधिक जण एकत्रित येण्यावर बंदी असणार आहे.
यंदाही महापालिकेेने महामेळाव्याचे आयोजन केले आहे. त्यासाठी समितीने जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि शहर पोलिस आयुक्त याडा मार्टीन मार्बन्यांग यांच्याकडे व्हॅक्सीन डेपो, लेले मैदान, धर्मवीर संभाजी महाराज चौक, संभाजी उद्यान, शहापूर येथील शिवाजी उद्यान याठिकाणी परवानगीसाठी पत्र दिले होते. पत्र देताना तुम्ही परवानगी दिली नाही तरी आमचा विरोध दर्शविण्यासाठी महामेळावा घेणारच, असा इशाराही समितीने दिला आहे. त्यानुसार समितीने धर्मवीर संभाजी महाराज चौकात मेळावा घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.
म. ए. समितीवर दबाव घालूनही महामेळावा रद्द होत नसल्यामुळे आज पोलिस आयुक्त याडा मार्टीन मार्बन्यांग यांनी पत्र काढून समितीच्या महामेळाव्याला परवानगी नाही, असे जाहीर केले आहे. तर समितीने मागितलेल्या व्हॅक्सीन डेपो, लेले मैदान, धर्मवीर संभाजी महाराज चौक, संभाजी उद्यान आणि शहापूर येथील शिवाजी उद्यानाच जमावबंदीचा आदेश बजावला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023, कलम 163 नुसार ही जमावबंदी असणार आहे.
जमावबंदीच्या काळात पाचपेक्षा अधिक जणांना एकत्र येता येणार नाही. मिरवणूक किंवा सभा करता येणार नाही. महामेळाव्याला परवानगी नाही. त्यामुळे परवानगी मिळालेल्या कोणत्याही अन्य संघटनेला शांततेत आंदोलन करता येऊ शकते. कोणालाही प्रक्षोभक भाषण करता येणार नाही. शांतता भंग करणारी कोणतीही पोस्टर्स दर्शवता येणार नाहीत. अपायकारी शस्त्र, साहित्य बाळगता येणार नाही, अशा अटी घालण्यात आल्या आहेत.
कोणत्याही स्थितीत महामेळावा घेणारच, या भूमिकेवर ठाम असलेल्या म. ए. समिती नेत्यांनी आज विविध ठिकाणांची पाहणी केली. व्हॅक्सीन डेपो मैदानात एकत्र जमून महामेळाव्याबाबत चर्चा केली. यावेळी युवा नेते शुभम शेळके यांनी कोणत्याही स्थितीत आम्ही महामेळावा घेणार आहोत. आम्हाला अटक झाली तरी कर्नाटकाच्या बेकायदा अधिवेशनाचा निषेध करणार आहोत, असे सांगितले. यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, आर. एम. चौगुले, रामचंद्र मोदगेकर, आर. के. पाटील, राजू किणयेकर, बाबू कोले, सचिन दळवी, शंकर कोनेरी, मारुती मरगाण्णाचे, रणजीत चव्हाण-पाटील, अॅड. एम. जी. पाटील, महादेव मंगणाकर, प्रवीण रेडेकर आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेश बंदी
महामेळाव्याला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख विजय देवणे यांनी महामेळाव्याला परवानगी नाकारली तर कोल्हापुरात कर्नाटकची वाहने आडवू असा इशारा दिला होता त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी शिवसेना उभाता गटाच्या नेत्यावर महामेळाव्या दिवशी बेळगाव प्रवेश बंदी लादली आहे अशा प्रकारचा प्रवेश बंदीचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बजावला आहे.
दरवेळी विजय देवणे यांच्या नेतृत्वात शिवसेना उबाठा गटाच्या वतीने आंदोलन करण्यात येते आणि सीमा भागातील मराठी भाषिकांना पाठिंबा देण्यात येतो यंदाही नेहमीप्रमाणे बेळगाव जिल्हा प्रवेश बंदीचा आदेश बजावण्यात आला आहे त्यानंतर सीमेवरील कर्नाटकात येजा करणाऱ्या वाहनांची तपासणी देखील केली जात आहे.