Monday, December 23, 2024

/

पोलिसी दंडेलशाहीला न जुमानता मराठी भाषिकांची घोषणाबाजी…

 belgaum

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधानसभा अधिवेशनाच्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या महामेळाव्याची धास्ती घेत प्रशासन आणि पोलीस विभागाने आधीपासूनच पोलीस फौजफाटा तैनात केला होता.

मराठी भाषिकांची आजवरची आंदोलने लक्षात घेत कालपासूनच जमावबंदीचा आदेश लागू केला होता. जमावबंदीचा आदेश लागू करूनही महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांवर कालपासूनच पोलिसांनी नजर रोखली होती.

प्रशासनाने परवानगी नाकारल्यामुळे व्हॅक्सिन डेपो येथे होणाऱ्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर धर्मवीर संभाजी चौक येथे निदर्शने करण्याचे ठरले. यानंतर पोलिसांनी धर्मवीर संभाजी चौकात मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला. कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा विरोध मराठी भाषिक किती ताकदीने करतो याची चांगलीच जाणीव असणाऱ्या प्रशासनाने काल रात्रीपासूनच नेतेमंडळींना ‘टार्गेट’ करत सुमारे ३० हुन अधिक जणांची यादी बनविली.

नेतेमंडळींच्या प्रत्येक हालचालीवर पोलीस लक्ष ठेवून होते. आज सकाळी माजी महापौर मालोजी अष्टेकर मॉर्निंग वॉक साठी गेले असता त्यांच्या पाठोपाठ पोलिसांचाही ‘वॉक’ सुरु झाला. जवळपास समितीचे सर्वच नेते पोलिसांच्या रडारवर असताना सर्वप्रथम शहापूर पोलिसांनी माजी नगरसेवक नेताजी जाधव यांना ताब्यात घेतले, तर पाटील मळा येथून प्रकाश मरगाळे यांना ताब्यात घेतले.

त्यानंतर पाठोपाठ हेमुकलानि चौकातून माजी उपमहापौर प्रकाश शिरोळकर यांना आणि न्यूक्लियस मॉल परिसरातून माजी आमदार मनोहर किणेकर आणि समिती नेते आर. एम. चौगुले यांच्यासह जवपास १५ ते २० कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. शहर समिती कार्याध्यक्ष रणजित चव्हाण पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, माजी महापौर सरिता पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील, मदन बामणे, ऍड. अमर येळ्ळूरकर, नगरसेवक रवी साळुंखे, खानापूरचे निरंजन सरदेसाई, माजी आमदार दिगंबर पाटील, धनंजय पाटील, राजू पावले, माजी आमदार दिगंबर पाटील  गणेश दड्डीकर यांच्यासह सुमारे ७८ कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले.

धर्मवीर संभाजी चौकाच्या दिशेने घोषणाबाजी करत निदर्शने करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी डीसीपी रोहन जगदीश यांनी स्वतः अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन धरपकडीचे सत्र राबविले. सकाळी १०.०० वाजण्याच्या सुमारास सुरु झालेले धरपकडीचे सत्र दुपारी १२.०० ते १२.३० वाजेपर्यंत सुरूच होते.Mes protest

अटक करण्यात आलेल्या समिती नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांपैकी काहींना एपीएमसी पोलीस स्थानकात तर काहींना मारिहाळ पोलीस स्थानकात स्थानबद्ध करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या सर्वांवर शांतता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या सर्व घडामोडीदरम्यान स्थानिक, राज्यस्तरीय आणि बाहेरील राज्यातील प्रसारमाध्यमांचीही मोठी उपस्थिती होती. बेळगावचा सीमा लढा, बेळगाव सीमावासीयांवर होणारे कर्नाटकी अत्याचार, लोकशाहीची चेष्टा आज सर्व जगभर दिसत असून कर्नाटकाच्या दडपशाही वृत्तीचे दर्शन आज देशाच्या कानाकोपऱ्यात दिसून येत आहे.

ज्यापद्धतीने कर्नाटक सरकार मराठी भाषिक, महाराष्ट्र एकीकरण समितीला डिवचण्याचे काम करते, सिमलढा अस्तित्वात नसल्याचे भाष्य करते आणि दुसरीकडे मराठी भाषिकांचा आवाज दडपण्याचे काम अशापद्धतीने करते, यावरून कर्नाटक सरकारला मराठी भाषिकांच्या ताकदीचा अंदाज नक्कीच असेल, याचमुळे अशी धास्ती सरकारला लागलेली आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.