बेळगाव लाईव्ह : कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या विरोधार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीने आज धर्मवीर संभाजी चौक येथे महामेळावा भरविण्याचे घोषित केले होते. या पार्श्वभूमीवर पोलीस विभाग आणि प्रशासनाने आधीपासूनच धास्ती घेत सोमवारी सकाळपासूनच जागोजागी समिती कार्यकर्त्यांच्या धरपकडीचे सत्र सुरु केले.
धर्मवीर संभाजी चौकात होणाऱ्या महामेळाव्यासाठी मराठी भाषिक एकवटणार आणि याचे परिणाम हिवाळी अधिवेशनावर दिसून येणार, तसेच मराठी भाषिकांची पुन्हा एकजूट होणार या भीतीनेच रविवारी रात्रीपासूनच पोलिसांनी ‘फिल्डिंग’ लावली होती. सोमवारी सकाळपासूनच धर्मवीर संभाजी चौकात जमणाऱ्या कार्यकर्त्यांना तसेच हिंडलगा भागातून येणाऱ्या कार्यकर्त्यांनाही अटक करत दडपशाहीचा अवलंब करण्यात आला.
महामेळाव्याच्या धास्तीने आजपासून नऊ दिवस जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला असून २० डिसेंबर २०२४ पर्यंत जमावबंदी लागू असेल. टिळकवाडी, कॅम्प, मार्केट व शहापूर पोलीस स्थानकाच्या हद्दीतील व्हॅक्सिन डेपो, लेले मैदान, धर्मवीर संभाजी चौक, धर्म. संभाजी उद्यान, छत्र. शिवाजी उद्यान आदी परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेचग महाराष्ट्र – कर्नाटकाच्या सीमेवर नाकाबंदी करण्यात आली असून महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
जमावबंदीचा आदेश जाहीर करण्यात आला असला तरीही महामेळावा यशस्वी केला जाईल, असं निर्धार महाराष्ट्र एकीकरण समितीने केला होता. या मेळाव्यात अनेक युवा कार्यकर्तेही सामील होत असल्याचे लक्षात घेत नेहमीप्रमाणेच कर्नाटक प्रशासनाने दडपशाहीने शेकडो कार्यकर्त्यांना अटक करत मराठी भाषिकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला आहे. प्रशासन आणि पोलीस विभागाच्या या धोरणामुळे पुन्हा लोकशाही पायदळी तुडवल्याचेच सिद्ध होत आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते, पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या, युवा कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर धर्मवीर संभाजी चौक परिसर संयुक्त महाराष्ट्र घोषणांनी दणाणून सोडण्यात आला होता. ‘बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’, ‘रहेंगे तो महाराष्ट्र में, नहीं तो जेल में’, ‘कर्नाटक सरकारचा धिक्कार असो’ अशा घोषणा देतच कार्यकर्ते पोलिसांच्या वाहनातून रवाना झाले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या महाराष्ट्रकीकरण समितीचे नेते आणि कार्यकर्त्यांना मारिहाळ पोलीस स्थानकात स्थानबद्ध केल आहे.