बेळगाव लाईव्ह :माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पेन्शन, बँकिंग आणि कागदपत्रांशी संबंधित तक्रारींचे निराकरण करणे, विविध सरकारी आणि वित्तीय संस्थांच्या प्रतिनिधींसोबत एक-स्टॉप सोल्यूशन प्रदान करणे या उद्देशाने बेळगाव येथील मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे आयोजीत भव्य माजी सैनिक (ईएसएम) मिळावा काल रविवारी उस्फुर्त प्रतिसादात यशस्वीरित्या पार पडला.
लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे आयोजित या मेळाव्यामध्ये बेळगाव जिल्हा आणि नजीकच्या महाराष्ट्रातील 1,485 माजी सैनिक आणि वीर नारींचा सहभाग होता. सदर मेळाव्याचे उद्घाटन एमएलआयआरसीचे कमांडर ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्या हस्ते झाले.
या मेळाव्यामध्ये पेन्शन-संबंधित प्रश्न, वैद्यकीय तपासणी आणि ईसीएचएस, डीएलसी, स्पर्श, आधार आणि पॅन कार्ड सेवा यासारख्या सुविधांसाठी समर्पित काउंटर देण्यात आले होते. ज्याचा मेळाव्यात सहभागी लाभार्थींना चांगला फायदा झाला. कॅन्टोन्मेंट बोर्ड हॉस्पिटल, मिलिटरी हॉस्पिटल आणि इतर आरोग्य युनिट यांच्या सहकार्याने एक वैद्यकीय शिबिरही आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये वीर नारी, माजी सैनिक आणि युद्धात अपंग झालेल्या सैनिकांना मोफत वैद्यकीय सेवा पुरविण्यात आली. मेळाव्याच्या निमित्ताने आयोजित विशेष समारंभात ब्रिगेडियर मुखर्जी यांनी 30 वीर नारी आणि पाच युद्ध-अपंग सैनिकांना त्यांच्या सेवा आणि बलिदानाबद्दल सन्मानित केले.
युद्ध-अपंग सैनिकांना हिरो मोटर्स आणि युद्ध जखमी फेडरेशनद्वारे जीवन सहाय्यक उपकरणे आणि आर्थिक मदत देखील प्रदान करण्यात आली.