बेळगाव लाईव्ह : भविष्यात विद्यार्थ्यांना आर्थिक नीती समजावी यासाठी सरकारने माजी पंतप्रधान, जागतिक ख्यातीचे अर्थतज्ज्ञ दिवंगत डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मरणार्थ बेंगळुरू विद्यापीठात भव्य संशोधन केंद्र उभारावे, अशी सूचना कर्नाटकाच्या उच्च शिक्षण मंत्र्यांना करण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिली. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी सदर मागणी केली आहे.
गांधी भारत कार्यक्रमाच्या व्यासपीठावर आज मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार म्हणाले, अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी बेंगळुरू विद्यापीठात डॉ. मनमोहन सिंग यांच्या नावाने अध्ययन आणि संशोधन केंद्र स्थापन करण्याची मागणी आपण केली आहे.
डॉ. मनमोहन सिंग यांचे योगदान देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी आणि धोरणात्मक बदलांसाठी अतिशय मोलाचे आहे. त्यांनी अनेक महत्त्वाचे कायदे लागू केले, ज्यामुळे गरीब, कामगार, आणि अनुसूचित जाती-जमातींसाठी फायदेशीर योजना अस्तित्वात आल्या.
डॉ. मनमोहन सिंग यांचा आर्थिक शास्त्रातील गाढा अभ्यास आणि दृष्टिकोन नवीन पिढ्यांसाठी प्रेरणादायक आहे. त्यामुळे, बेंगळुरू विद्यापीठाने त्यांच्या स्मृतीला अभिवादन करत अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष अध्ययन व संशोधन केंद्र स्थापन करावे. या केंद्राच्या माध्यमातून डॉ. सिंग यांच्या विचारांचा आणि कार्याचा अभ्यास होईल, तसेच देशातील भावी अर्थतज्ज्ञ तयार होतील.
डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली देशाने आर्थिक सुधारणांचा नवीन अध्याय अनुभवला. त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्वाच्या योजनांची अंमलबजावणी झाली, जसे की आशा कार्यकर्त्यांची योजना, मनरेगा, अनुसूचित जाती-जमातींसाठी वन हक्क कायदा यांसारख्या योजना.
त्यांच्या या योगदानाचा सन्मान करण्यासाठी बेंगळुरू विद्यापीठाने त्यांच्यावर आधारित एक विशेष केंद्र स्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे. डॉ. मनमोहन सिंग यांचे कार्य देशासाठी प्रेरणादायी असून त्यांच्या नावाने अध्ययन व संशोधन केंद्र उभारल्याने विद्यार्थ्यांना त्यांचा आदर्श समजला जाईल, असे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी सांगितले.