बेळगाव लाईव्ह : २६ डिसेंबर १९२४ साली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली बेळगावमध्ये जे काँग्रेसचे अधिवेशन झाले होते, त्या अधिवेशनाला २६ डिसेंबर १९२४ रोजी, १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या शतकपूर्ती महोत्सवानिमित्त काँग्रेसच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. गांधी भारत या उपक्रमांतर्गत वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
अधिवेशनाच्या शतकपूर्तीचा सोहळा ऐतिहासिक आणि भव्य दिव्य साजरा करण्याचा मानस काँग्रेस सरकारने ठेवला असून या पार्श्वभूमीवर बेळगावचे स्वातंत्र्य सैनिक विठ्ठलराव याळगी यांच्याशी ‘बेळगाव लाईव्ह’ने केलेली बातचीत…..
१९२४ साली झालेल्या अधिवेशनात स्वातंत्र्य सैनिक विठ्ठलराव याळगी यांचे वडील आणि काकांनी सहभाग घेतला होता. या अधिवेशनाची इत्यंभूत हकीकत वडिलांकडून आणि काकांकडून मला ऐकायला मिळाली आहे. माझ्या वडिलांचा आणि काकांचा या अधिवेशनात हिरीरीने सहभाग होता. बेळगाव विरसौध येथील काँग्रेस विहीर हि माझ्या वडिलांच्या देखरेखीखाली बांधली.
अधिवेशन भरलेली खरी जागा व्हॅक्सिन डेपो मैदान हि असून १९२३ साली याठिकाणी तंबू मारला होता. फर्निचरचे काम गजाननराव देशपांडे यांनी केलेले होते. गांधीजी उतरले त्या तंबूचे बांधकाम खेमाजीराव गोडसे यांनी केले होते. या ताम्बुबद्दल काहींनी महात्मा गांधींना प्रतिक्रिया विचारली, त्यावेळी, हे’ हट नाही पॅलेस आहे’! असे गांधीजी म्हणाले होते. पुंडलिक कातर्डे गांधीजींचे अनुयायी यांच्याकडे काम सोपविले होते.
पंडित जवाहरलाल नेहरू ज्या तंबूत राहात होते, त्यांची व्यवस्था पुंडलिक यांनी बघायची. ते काम त्यांनी चोखपणे बजावले. महात्मा गांधींच्या अध्यक्षतेखाली जे अधिवेशन भरविण्यात आले त्याचे स्वागताध्यक्ष गंगाधरराव देशपांडे. देशपांडे आणि याळगी कुटुंबाचे जवळचे स्नेहसंबंध होते. गंगा आणि यमुना नदीचे नाव ज्या पद्धतीने ओघात घेतले जाते, त्याचप्रमाणे देशपांडे आणि याळगी कुटुंबाचे नाव घेतले जायचे. गोविंद याळगी यांनी १९०५ साली पहिला सत्याग्रह केला. ते लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते. खडेबाजार येथील कोपऱ्यावर गंगाधरराव देशपांडे आणि गोविंद याळगी यांनी परदेशी कपड्यांची होळी केली. त्यांना १० दिवस कारागृहाची शिक्षा ठोठावण्यात आली. १० रुपये दंड ठोठावण्यात आला. हा दंड त्यावेळी लोकमान्य टिळकांनी भरला आणि त्यांची सुटका केली.
महात्मा गांधीजी बेळगावमध्ये जवळपास ६ वेळा येऊन गेले आहेत, १९३४ साली टिळकवाडी येथे त्यांनी मंगळवार पेठेतील बंडोपंत कुलकर्णी यांच्या घरी त्यांच्या ३ दिवस मुक्काम होता. आपण ८ वर्षांचे असताना महात्मा गांधींची पहिली भेट मी घेतली. त्यांना भेटण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. १९३७ साली हुदली येथे गंगाधर देशपांडे यांच्या गावी शिबिरासाठी आले होते. घरी न सांगता गांधीजींची भेट घेण्यासाठी आपण हुदली मध्ये पोहोचलो. अशा अनेक आठवणी आपल्या आणि गांधींच्या असल्याचे ते म्हणाले.
बेळगावमध्ये भरविण्यात आलेल्या अधिवेशनादरम्यान बेळगावची लोकसंख्या १० ते १५ हजारांच्या घरात होती. यावेळी भरविण्यात अधिवेशनासाठी सबंध भारतातून सुमारे ५००० प्रतिनिधी बेळगावमध्ये दाखल झाले. यावेळी आलेल्या प्रत्येकाची सोय करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने टिळकवाडी दुसरे रेल्वे गेट येथे तात्पुरते स्थानक उभारले होते. यामुळे अधिवेशनासाठी आलेल्या प्रतिनिधींना अधिवेशनाच्या ठिकाणी जाणे सोयीचे ठरले. अलीकडे वाढलेल्या सिमेंटच्या जंगलामुळे टिळकवाडी दुसरे रेल्वे गेट ते व्हॅक्सिन डेपो झाकोळला गेला आहे. परंतु त्यावेळी दुसऱ्या रेल्वे गेटनजीक थांबल्यास व्हॅक्सिन डेपो परिसर स्पष्टपणे दिसत होता, असे विठ्ठलराव याळगी म्हणाले.
विठ्ठलराव याळगी यांचे काका जीवनराव याळगी यांच्याकडे गांधीजींच्या तंबूच्या विजेची व्यवस्था सोपविण्यात आली होती. मुंबईहून आणलेल्या जनरेटरच्या माध्यमातून त्यावेळी विजेची सोय करण्यात आली होती. अधिवेशनाला सुरुवात झाली, लोक जमले, यावेळी सर्वप्रथम गांधीजींनी गोविंदराव याळगी यांच्या कार्याची दखल घेत त्यांना श्रद्धांजली वाहिली.
काँग्रेस अधिवेशनाच्या शतकपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने बेळगावमध्ये होऊ घातलेल्या कार्यक्रमासाठी काँग्रेसने स्वातंत्र्य सैनिक विठ्ठलराव याळगी यांना रीतसर आमंत्रण दिले आहे. गांधीजींच्या विचारधारेला जपत त्यांची विचारधारा पुढे नेण्यात यावी, गांधीजींच्या विचारांवर हा देश चालणार नाही. ज्या व्यक्तीचे १७६ देशांमध्ये पुतळे उभारण्यात आले यावरून ती व्यक्ती सामान्य नव्हती हे सिद्ध होते. गांधीजींचे विचार आपण पुढे न्यायचे. अहिंसा, सत्य या तत्वाची कास प्रत्येकाने धरावी.
भ्रष्टाचाराची लागलेली कीड कशी कमी करता येईल, याकडे हल्लीच्या तरुणांनी लक्ष दिले पाहिजे. आता ज्या पद्धतीने राज्यकारभार चालविले जात आहेत, याचा खेद वाटतो. हल्लीच्या राज्यकारभारात चुकीच्या पद्धतीने बदल करण्यात येत असल्याचे जाणवत आहे. हा देश गांधींच्या विचारांनीच पुढे जाणारा आहे, असेही विठ्ठलराव याळगी म्हणाले.