बेळगाव लाईव्ह : महाद्वार रोड चौथा क्रॉस परिसरातील नागरिक मूलभूत सुविधांच्या अभावामुळे त्रस्त झाले आहेत. या भागातील गटारींची स्वच्छता केली जात नाही, तर पथदीपही बंद अवस्थेत आहेत. परिणामी, रात्रीच्या वेळी या भागात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.
गटारींच्या स्वच्छतेकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे घाण साचून राहिली आहे. यामुळे दुर्गंधी पसरत असून, डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
गेल्या चार महिन्यांपासून या भागातील पथदीप बंद आहेत. अंधारामुळे अनेक अपघात होत असून रात्रीच्यावेळी या भागातून जा ये करणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्येबाबत निवेदन देऊनही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
या भागातील समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, असे स्थानिकांचे म्हणणे असून मुलभूत सुविधा पुरवण्यात प्रशासन व लोकप्रतिनिधी सपशेल अपयशी ठरल्याचे त्यांनी नमूद केले.
येथील नागरिकांनी या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, पथदीप कार्यान्वित करावेत आणि गटारींची स्वच्छता करावी, अशी मागणी केली आहे.