बेळगाव लाईव्ह विशेष : काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दीनिमित्त बेळगावमध्ये येत्या २६ आणि २७ डिसेंबर रोजी भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावमध्ये 1924 साली झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा शताब्दी सोहळा साजरा करण्याची जय्यत तयारी सध्या शहरात करण्यात आली असून प्रमुख रस्ते आणि चौकांचे विद्युत रोषणाईने सुशोभीकरण करण्याबरोबरच रस्त्याशेजारी भिंतींवर आकर्षक रंगकाम करण्यात आले आहे. महत्वाच्या चौकांमधून अनेक राष्ट्रपुरुषांच्या, महापुरुषांच्या, विरांगणांच्या प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत. ज्याठिकाणी वर्दळ नाही अशा ठिकाणीही विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मात्र बेळगावमधील छत्रपती शिवाजी उद्यान आणि धर्मवीर संभाजी चौकात जाणीवपूर्वक विद्युत रोषणाई करण्यात आलेली नसल्याचे जाणवत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी नेहमीच कर्नाटकातील सरकारला कावीळ झालेली दिसून आली आहे. बेळगावमध्ये होणाऱ्या ऐतिहासिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कोट्यवधी रुपयांच्या खर्चातून चौक, रस्ते, महत्वाच्या ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मात्र छत्रपती शिवाजी उद्यानाकडे तसेच धर्मवीर संभाजी चौकाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचे जाणवत आहे. बेळगावमधील विविध चौकांमध्ये रोषणाईच्या माध्यमातून प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत. महात्मा गांधी, राणी कित्तूर चन्नम्मा, अयोध्या श्रीराम मंदिर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शेतकरी आदींसह अनेक महापुरुषांच्या प्रतिकृती शहरातील राणी चन्नम्मा सर्कल, संगोळी रायन्ना सर्कल, श्री कृष्णदेवराय सर्कल, किल्ला तलाव सर्कल आणि शहापूर बसवेश्वर सर्कल या चौकासह शहरातील एकूण 30 हून अधिक चौकांची विद्युत रोषणाईद्वारे आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
मात्र छत्रपती शिवाजी उद्यान परिसरात किंचितही रोषणाई करण्यात आली नाही, हि बाब प्रत्येकाच्या नजरेस खटकते आहे. याच शिवाजी उद्यान परिसरात महात्मा गांधी स्मारक देखील आहे. परंतु याकडेही गांधी भारत आयोजकांचे, प्रशासनाचे दुर्लक्ष झाले हे दुर्दैव म्हणावे लागेल. ज्या महात्मा गांधींच्या स्मरणार्थ बेळगावमध्ये हा सोहळा होऊ घातला आहे, त्याच महात्मा गांधींच्या स्मारकाकडे दुर्लक्ष करणे हे कितपत योग्य आहे? याचा विचार होणे गरजेचे आहे.छत्रपती शिवाजी महाराज हे कोणा एका धर्माचे, प्रांताचे, भाषेचे, समाजाचे वा राज्यापुरते मर्यादित नव्हते. ३५० वर्षांनंतरही जाज्वल्य इतिहास नजरेसमोर तरळतो, अंगावर शहारे येतात, त्या राजाचा विसर स्वार्थी राजकारणासाठी केला जातो, हे आपले दुर्दैव म्हणावे लागेल. काँग्रेसच्या वतीने, कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या सहकार्याने हा सोहळा आयोजिण्यात आला आहे. याच काँग्रेसच्या महिला आमदारांनी गेल्या दोन वर्षांपूर्वी श्रेयवादासाठी राजहंसगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसंदर्भात घमासान मांडले. दक्षिण विजय मिळविलेल्या आमदारांनी छत्रपती शिवाजी उद्यान परिसरात असलेल्या शिवसृष्टीवरून श्रेयवादाचे राजकारण रंगविले. मात्र आता बेळगावमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात सोहळा होत असताना पद्धतशीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा विसर पडला कि जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजी महाराजांना वगळण्यात आले? कि यामागे आणखी कोणते राजकारण शिजते आहे? याचा विचार काँग्रेस आमदार, नेतेमंडळी यासह भाजपच्या आमदार आणि नेतेमंडळींनी करणेही तितकेच गरजेचे आहे. राज्य, राष्ट्रीय कार्यकारिणीला, गांधी भारत आयोजकांना, कर्नाटकातील काँग्रेस सरकारला, महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी, येथील स्थानिक आमदार आणि नेत्यांनी याचा जाब विचारणे गरजेचे आहे.