बेळगाव लाईव्ह ;एका राज्यातील महिलांचे मी राजकारणात प्रतिनिधित्व करत असताना ‘तो’ अपशब्द वारंवार उच्चारून सी. टी. रवी यांनी माझ्या आत्मसन्मान व आत्मविश्वासाला ठेच पोहोचवली आहे. मी खचून जाणारी, घाबरणारी नाही, परंतु मी देखील कुणाची तरी आई -बहीण आहे, असे महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी गहिवरून सांगताना तथापि आज माझ्या मतदारसंघातील जनता माझे कुटुंबीय आणि काँग्रेस पक्ष माझ्या पाठीशी आहे, असे स्पष्ट केले.
बेळगाव शहरात आज शुक्रवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्या बोलत होत्या. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले की, संसदेमध्ये देशाच्या घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केले गेले. याच्या निषेधार्थ आम्ही विधान परिषद सभागृहात धरणे सत्याग्रह केला.
कारण भारतरत्न डॉ आंबेडकर यांच्यामुळेच आज देशातील आम्हा महिलांना आमदार, खासदार, मंत्री होता येत आहे. त्यांनी घटनेत महिलांना समान हक्क दिले आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल आम्ही धरणे सत्याग्रह केला. त्यासाठी सभापतींनी देखील कांही काळ सभागृहाचे कामकाज तहकूब केले. त्यानंतर सभापती आपल्या कक्षात गेले त्यावेळी मी माझ्या आसनावर स्वस्थ बसून होते. त्यावेळी सी. टी. रवी यांनी आमचे नेते राहुल गांधी यांच्या संदर्भात तीन-चार वेळा ड्रग एडिक्ट, ड्रग एडिक्ट असे अवमानकारक संबोधन केले.
ते ऐकून घेऊनही मी शांत बसले होते. मात्र तरीही माझ्याकडे पाहून सी. टी. रवी राहुल गांधी यांना ड्रग एडिक्ट, ड्रग एडिक्ट असे म्हणत राहिले. तेंव्हा मात्र मला गप्प बसणे अशक्य झाले. राहुल गांधी यांना तुम्ही ड्रग एडिक्ट का म्हणता? असा जाब विचारून मग अपघात केला असल्यामुळे तुम्ही देखील खुनी होऊ शकता, असे मी सी. टी. रवी यांना सुनावले. तेंव्हा जीभ घसरलेल्या सी. टी. रवी यांनी माझ्या बाबतीत चारचौघात बोलताही येणार नाही असा ‘तो’ अश्लील अपशब्द उच्चारला, असे मंत्री हेब्बाळकर यांनी खेदाने स्पष्ट केले.
दुःखी झालेल्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर त्यानंतर गहिवरून बोलताना पुढे म्हणाल्या की, राजकारणामध्ये मी अतिशय धैर्याने, मोठ्या कष्टात सामान्य महिला कार्यकर्ता म्हणून प्रवेश केला आणि आज या पदापर्यंत पोहोचली आहे. एका राज्यातील महिलांचे राजकारणात प्रतिनिधित्व करत आहे. ही वस्तुस्थिती असताना ‘तो’ अपशब्द वारंवार उच्चारून रवी यांनी माझ्या आत्मसन्मान व आत्मविश्वासाला धक्का पोहोचवला. मी खचून जाणारी, घाबरणारी नाही, परंतु मी देखील कुणाची तरी आई -बहीण आहे.
आज माझ्या बाबतीत जे घडलं ते पाहून राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या असंख्य महिलांना काय वाटेल? आमच्यासारख्या महिला लोकप्रतिनिधीच्या बाबतीत सभागृहात असा गैरप्रकार घडतो याचेच खूप दुःख वाटते. घडल्या घटनेचा मला मोठा धक्का बसला असून मी शॉकमध्ये आहे. त्यामुळे त्या संदर्भात मी अधिक प्रतिक्रियाही व्यक्त केलेली नाही.
त्या घटनेनंतर माझ्या सुनेने फोनवर माझ्याशी संपर्क साधून तुम्ही येऊ योध्दा आहात, आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत असे सांगितले. माझ्या मुलाने देखील बेंगलोर मधून मला फोन करून धीर दिला असून तो माझ्या पाठीशी आहे, माझ्या मतदारसंघातील जनता माझ्या पाठीशी आहे आणि काँग्रेस पक्षही माझ्या पाठीशी आहे. याहून अधिक मी काहीच बोलू शकत नाही, असे महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर शेवटी म्हणाल्या.