बेळगाव लाईव्ह : सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आयोजित महामेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी कोल्हापूरहून शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते बेळगावकडे रवाना होत असता कोगनोळी सीमेवरच त्यांना अडविण्यात आले. सुमारे ७० ते ८० शिवसैनिक बेळगावच्या दिशेने येत असता त्यांना रोखून अनेकांना ताब्यात देखील घेण्यात आले आहे.
सीमाभागात आयोजिण्यात आलेल्या महामेळाव्याच्या पार्श्वभूमीवर सीमेवर आधीपासूनच नाकाबंदी करण्यात आली होती. तसेच चोख पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. महामेळाव्याला प्रशासनाने परवानगी नाकारली होती.
तसेच विनापरवाना महामेळावा आयोजित करण्यात आल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला होता. मात्र तरीही प्रशासनाच्या दंडेलशाहीला न जुमानता मोठ्या संख्येने मराठी भाषिकांनी महामेळाव्याच्या ठिकाणी येण्यास सुरुवात केली. मात्र मराठी भाषिक एकत्रित येणार हे लक्षात घेत पोलिसांनी आधीपासूनच नाकाबंदी करत सीमाभागासह महाराष्ट्रातील नेत्यांनाही ताब्यात घेतले.
या महामेळाव्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरहून बेळगावला येणाऱ्या विजय देवणे, संजय पोवार, सुनील शिंत्रे, सुनील मोदी यासह अनेक शिवसेना कार्यकर्त्यांना निपाणी सीमेत पोलिसांनी अडवले.
यावेळी कोल्हापूर शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय देवणे आणि इतर कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलिस आणि शिवसेना कार्यकर्त्यांची वादावादी देखील झाली. यावेळी संतप्त मराठी भाषिक शिवसैनिकांनी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देत आक्रोश व्यक्त केला.