बेळगाव लाईव्ह : हिवाळी अधिवेशनासाठी बेळगावमध्ये आलेल्या कर्नाटकातील मंत्रिमहोदयांनी आज कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापूर दौरा आखला. माजी पशुसंवर्धन मंत्री प्रभू चौहान, सुनील कुमार यांच्यासह आमदारांनी आज महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील अंबाबाई दर्शनासाठी दाखल होताच यावेळी उद्धव ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना रोखले.
9 डिसेंबर रोजी बेळगाव येथे महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या महामेळाव्यात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटकात ताब्यात घेण्यात आले. महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटकात प्रवेश बंदी करण्यात आली. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
शिवसेनेचे उपनेते संजय पवार आणि सह संपर्कप्रमुख विजय देवणे यांनी कर्नाटकाचे मंत्री आणि आमदारांना अंबाबाई मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ अडवलं. आक्रमक झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना चांगलाच जाब विचारला.
आम्हाला बेळगाव मध्ये येण्यासाठी बंदी घालता मग तुम्ही का महाराष्ट्रात आला? असा संतप्त सवाल उपस्थित करत प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी उपस्थित मंत्री महोदयांनी तुमचं म्हणणं आम्ही सरकारपर्यंत पोहोचू आणि त्यांना विचारू असे आश्वासन दिले.
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना माजी मंत्री प्रभू चौहान म्हणाले, आपल्याला महाराष्ट्रात अडविण्यात आले नाही. परंतु लोकशाही व्यवस्थेत सीमाभागातील नागरिकांना कशापद्धतीने वागविण्यात येते हे आपल्या निदर्शनात आणून देण्यात आले.
लोकशाही आणि संविधान जिवंत राहिले पाहिजे. सीमाप्रश्न आपण आपल्या जन्मापासून पाहात आलो आहोत. या पार्श्वभूमीवर आपण विरोधी पक्ष म्हणून हि भूमिका कर्नाटक सरकार समोर मांडू, असे आश्वासन त्यांनी दिले.