बेळगाव लाईव्ह :मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना अश्लील अपशब्द वापरणारे विधान परिषद सदस्य सी. टी. रवी यांना पोलिसांनी अटक करून खानापूर पोलीस ठाण्यात आणले असता, त्यावेळी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांच्यावर ठेवण्यात आला असून त्यांना निलंबित करण्याचा आदेश बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक विकासकुमार विकास यांनी बजावला आहे.
विधान परिषद सभागृहात मंत्री हेब्बाळकर यांना अपशब्द उच्चारण्याच्या आरोपावरून हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात आणण्यात आलेल्या विधान परिषद सदस्य सी. टी. रवी यांना तेथून खानापूर पोलीस ठाण्यात हलवण्यात आले.
तत्पूर्वी खानापूर पोलीस ठाण्यात आवश्यक बंदोबस्त ठेवण्याची सूचना पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांना करण्यात आली होती. मात्र नाईक यांनी हलगर्जीपणा केल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
या पद्धतीने कायदा व सुव्यवस्था हाताळण्यात अपयशी ठरल्याबद्दल पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांना निलंबित करण्यात आल्याचे आदेशात म्हंटले आहे.
सी. टी. रवी यांना अटक झाली असताना देखील त्यांच्याशी पोलीस निरीक्षक नाईक हे सौजन्याने वागत असल्याचे त्या दिवशी सर्वच अधिकाऱ्यांनी पाहिले होते. त्यांचे हे वर्तनच त्यांना भोवल्याची चर्चा पोलीस दलात होत आहे.