बेळगाव लाईव्ह : दक्षिण भारतीय कुस्ती महासंघाच्यावतीने तामिळनाडू येथे आयोजित दक्षिण विभागीय राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या कंग्राळी खुर्द (ता. जि. बेळगाव) येथील प्रेम लक्ष्मण जाधव आणि कुमारी कल्याणी परशराम पाटील या होतकरू युवा मल्लांचे काल रात्री बेळगाव रेल्वे स्थानकावर उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
राष्ट्रीय पातळीवर सुयश मिळवणाऱ्या बेळगाव रेल्वे स्थानकावरील स्वागताप्रसंगी प्रेमचे वडील लक्ष्मण भावकाना जाधव, आई रूपा लक्ष्मण जाधव, कल्याणीचे वडील परशराम पाटील, आई सुजाता परशराम पाटील, कंग्राळी खुर्द येथील ग्रा. पं. सदस्य प्रशांत पाटील कल्लाप्पा पाटील बाल हनुमान तालीम वस्ताद भाऊ पाटील, वस्ताद मनोहर पाटील, नारायण पाटील, प्रल्हाद पाटील, प्रशांत पाटील, मनोज पाटील, प्रमोद घुग्रेटकर, निशांत पाटील, अमोल पाटील, राकेश धामणकर, विनायक पाटील, कामेश पाटील ज्योतिबा पाटील, शट्टूपा कल्लाप्पा पाटील, सविता बाळकृष्ण निर्मळे भाऊराव गोपाळ पाटील, अमोल निंगाप्पा पाटील आदींसह कंग्राळी खुर्दवासिय बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित गावकऱ्यांकडून राष्ट्रीय पातळीवर आपल्या गावाचे नांव उज्वल करणाऱ्या प्रेम जाधव आणि कल्याणी पाटील यांचा मानाचा फेटा बांधून पुष्पहार अर्पण करून रेल्वे स्थानकावरच जाहीर सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थितांनी दोन्ही मल्लांना पुष्पहार घालून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव केला. रूपा जाधव व सुजाता पाटील या दोघी मातांनी आपल्या मुलांचे औक्षण करून त्यांना आशीर्वाद दिले. यावेळी मिठाईचे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
तामिळनाडू येथे गेल्या दि. 27 व 28 डिसेंबर 2024 रोजी सदर राष्ट्रीय पातळीवरील कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सदर दक्षिण भारतातील कुस्ती स्पर्धेत कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ वगैरे आठ राज्यातील मल्लांचा सदर राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग होता. सदर स्पर्धेत कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व करताना कगाळे खुर्द गावच्या प्रेम जाधव याने 125 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले.
त्याचप्रमाणे महिलांच्या विभागात कल्याणी पाटील हिने 59 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावले. प्रेम जाधव हा शहरातील बेनन स्मिथ महाविद्यालयामध्ये कला शाखेच्या द्वितीय वर्ष पदवी अभ्यासक्रमाचा विद्यार्थी आहे. अलीकडेच दिवंगत झालेले ख्यातनाम मल्ल वस्ताद काशीराम पाटील यांचा पठ्ठा असलेला प्रेम या वस्ताद भाऊ पाटील आणि एनआयएस कुस्ती प्रशिक्षक प्रशांत पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी कोल्हापूरच्या मोतीबाग तालमीमध्ये मातब्बर मल्लांसोबत मल्ल युद्धाचे धडे घेणारा प्रेम हा सध्या कंग्राळी खुर्द येथील तालमीमध्ये आपल्या वस्तादांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचा सराव करतो.
कंग्राळे खुर्द गावची होतकरू महिला मल्ल कल्याणी परशराम पाटील हीचे माध्यमिक शिक्षण कंग्राळी खुर्द येथील मार्कंडेय हायस्कूलमध्ये झाले आहे. त्याचप्रमाणे महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूर येथे सुरू आहे.
सध्या पुणे येथील शिवछत्रपती कुस्ती संकुलमध्ये ती कुस्तीचे धडे घेत आहे. राष्ट्रीय स्पर्धेतील उपरोक्त यशाबद्दल या दोन्ही मल्लांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.