बेळगाव लाईव्ह : उद्योजक आर. एन. नायक हत्या प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या, हिंडलगा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या बन्नंजे राजाच्या के. एम. इस्माईल या साथीदाराचा संशयास्पद मृत्यू झाला आहे.
मागील 9 वर्षांपासून हिंडलगा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला के. एम. इस्माईल याला आज अचानक श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्याला उपचारासाठी तातडीने बेळगाव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.
मात्र, रुग्णालयाकडे जाताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. इस्माईल याला यापूर्वी दोनदा हृदयविकारासंबंधित उपचार करण्यात आले होते. सध्या त्याचा मृतदेह बीम्स शवागारात ठेवण्यात आला आहे.
केरळमधील कासरगोड येथील रहिवासी असलेल्या इस्माईल याच्या कुटुंबीयांचे आगमन होईपर्यंत शवविच्छेदन होणार नाही. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाईल, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. ही घटना बेळगाव एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, तपास सुरू आहे.