बेळगाव लाईव्ह : ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ चा नारा देणारा भाजप गोमुखी वाघासारखा आहे, अशी टीका महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केली. भाजपचे विधान परिषद सदस्य सी. टी. रवी यांनी नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याविषयी अपशब्द वापरले होते.
यानंतर मोठा गोंधळ निर्माण झाला. सी. टी. रवी यांची अटक आणि जामीन यानंतर याप्रकरणी आज मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी सी. टी. रवी यांच्यासह भाजपवर देखील त्यांनी जोरदार टीका केली. यावेळी सभागृहातील ‘त्या’ गदारोळाची ऑडिओ क्लिप देखील मंत्री लक्ष्मी हेबाळकर यांनी प्रसारमाध्यमांसमोर जाहीरपणे मांडली आहे.
विधानपरिषदेचे कामकाज सुरु असताना सी. टी. रवी यांनी वादग्रस्त विधान केले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविषयीची चुकीची वक्तव्ये केली. सी. टी. रवी हे जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र त्यांच्या बोलण्याने माझे मन दुखावले गेले. हा केवळ माझा एकटीचा अपमान नसून राज्यातील कोट्यवधी महिलांचा अवमान आहे. एकीकडे राजकारणात महिलांचा सहभाग वाढावा यासाठी प्रयत्न सुरु असताना अशापद्धतीने एका जबाबदार पदावर कार्यरत असणाऱ्या नेत्याने अशी हीन दर्जाची वक्तव्ये केल्यास महिला घाबरतील. राजकारणात उतरणार नाहीत.
सी. टी. रवी यांना जोवर शिक्षा मिळणार नाही तोवर आपण कायदेशीर पद्धतीने लढा देणार, आपल्याला न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही, असा इशारा देत त्या म्हणाल्या, भाजपचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. भाजपचे वरिष्ठ नेते महिलांवरील अत्याचाराला समर्थन देतात, जो खेदजनक आहे.
रामराज्याची भाषा करणाऱ्या पंत्रप्रधान मोदींनी माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, महिलांवर अत्याचार करण्यास तुमची परवानगी आहे का? तुमच्याच पक्षाचे आमदार सभागृहात अपशब्द वापरतात. घडल्या प्रकारचे सर्व पुरावे आपल्याकडे आहेत. याबाबत आम्ही सर्व पुरावे सादर करू, असेही त्या म्हणाल्या.